लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई शहर आणि उपनगरात दैनंदिन रुग्ण व मृत्यू संख्या कमी झाल्याने पॉझिटिव्हिटी दरही घटला आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर १.१४ टक्क्यांच्या खाली आला आहे. शहर - उपनगरात मंगळवारी ३४३ नव्या रुग्णांची, तर पाच मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांची संख्या पाचशेच्या खाली नोंदविली जात आहे. तसेच, कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. शहर - उपनगरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्येही घसरण झाली असून, सध्या केवळ पाच प्रतिबंधित क्षेत्र असून, ६१ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मुंबईत आत्तापर्यंत सात लाख ११ हजार ३१५ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के झाले असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १३७७ दिवसांवर पोहोचला आहे.
.......
निर्बंधाचा स्तर कमी करा
मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे, तरीही मुंबईत लेव्हल ३चे निर्बंध लागू आहेत. सध्याच्या परिस्थितीत लेव्हल २ किंवा १चे निर्बंध लावण्याची गरज आहे. त्यामुळे मुंबईत बऱ्याच गोष्टी सुरू होऊन मुंबईकरांना दिलासा मिळेल. व्यापारी आणि कर्मचारी अडचणीत आले आहेत. त्यामुळे मुंबईतील दुकाने पूर्णवेळ सुरू करावीत. तसेच ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना व्यापाराची मुभा द्यावी. - विरेन शाह,
अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशन
......
निर्बंधांमुळे उपासमारीची वेळ
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होतो, याचा कुठलाही पुरावा नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लेव्हल तयार केल्या होत्या. त्यानुसार मुंबईत आणखी निर्बंध शिथिल करायला हवे होते. पण, त्याचे पालन मुंबईत होताना दिसत नाही. निर्बंधांमुळे ४० टक्के रेस्टॉरंट बंद झाली आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्याचे स्वागत करतो. पण, नाकापेक्षा मोती जड असून चालत नाही. कोरोनापेक्षा निर्बंधांमुळे अनेक जणांवर उपासमारीची वेळ आहे. सरकारने लवकरात लवकर हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करावेत.
- गुरबक्षीश सिंग,
उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन्स ऑफ इंडिया.
......................