नऊ महिन्यांत मुंबईने केली ‘साठी’पार; अवयवदानात मायानगरीची आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:42 AM2019-10-30T00:42:09+5:302019-10-30T00:42:23+5:30
पुणे, नागपूर, औरंगाबादला टाकले मागे
मुंबई : राज्यातील अवयवदानात मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. २०१८ च्या अवयवदानाचा आकडा पार करत २०१९ मध्ये मुंबईने साठी ओलांडली आहे, त्यापाठोपाठ पुणे, नागपूर, औरंगाबादचा क्रमांक आहे. दरम्यान, शहरी भागात अवयवदानाची टक्केवारी वाढत असल्याचे निरीक्षण आहे.
मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीने (झेडटीसीसी) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत यंदाच्या वर्षातील हे ६७ अवयवदान पार पडलं आहे. २०१८ साली मुंबईत वर्षभरात ४८ अवयवदानाची नोंद करण्यात आली होती. मात्र २०१९ सालच्या नऊ महिन्यांत अवयवदानाच्या आकड्याने साठी पार केली. विशेष म्हणजे, फक्त सप्टेंबर महिन्यात झालेल्या आठ कॅडेव्हर डोनेशनमुळे तब्बल २४ जणांना जीवनदान मिळाले आहे.
याविषयी, मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. एस. के. माथूर यांनी सांगितले की, अवयवदानासाठी लोकांनी पुढे यावे यासाठी सरकारद्वारे जनजागृती केली जाते आहे. यामुळे आता लोकांच्या मनात अवयवदानाबाबत असणारे गैरसमज दूर होत आहेत. यामुळेच मुंबईत अवयवदानाचा आकडा वाढतो आहे. मुंबई आणि ठाण्यात यंदा सर्वांत जास्त अवयवदान झाले आहे.
खेडेगावात पुरेशी जनजागृती नसणे आणि आवश्यक उपाययोजनांचा अभाव असल्याने अवयवदान खूप कमी होते आहे. तसेच डॉक्टरांमध्येही अवयवदानाबाबत माहिती नाही. याशिवाय देहदान करण्यासाठी रुग्णालयात आधी मृत्यूचा दाखला द्यावा लागतो. पण गावखेड्यात हे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागत असल्याने इच्छा असूनही अनेकांना देहदान करता येत नाही. त्यामुळे अवयवदान वाढवायचे असल्यास यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे.