- मनोहर कुंभेजकरमुंबई - मढ कोळीवाडा वांजरे गल्ली येथील मढ दर्यादिप मच्छिमार सह. संस्थेचे सभासद अंतोन बस्त्याव कोळी राहणार भोतकर गल्ली यांची मासेमारी नौका नाव सेंट पिटर नोंदणी क्रमांक IND-MH-02- MM-7254 ही नौका जीपीएस 19-08-082 तसेच 72-41-375 या ठिकाणी आज दिनांक १८ मार्च रोजी ९ वावांमध्ये मासेमारी करीता गेली होती. मढची शिव शंभो ही दुसरी मासेमारी नौका नोंदणी क्रमांक IND-MH-02-MM-4833 हिने सेंट पीटर नौकेला दुपारी जोरदार धडक देवून तेथून निघून गेली.
धडक दिल्याने अंतोन कोळी यांची नौका बुडाली, नौकेवरील खलाशांना जवळच असलेल्या अंतोन कोळी यांचे बंधू सायमन कोळी यांच्या नौकेवरील खलाश्यांनी या दुर्घटनाग्रस्त तीन खलाश्यांना वाचवले. परंतू सदर नौका पूर्णतः पाण्यात बुडाली आहे. मच्छिमार बांधव आपल्या नौकांनी सदर नौकेचा शोध घेवून पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मढ दर्यादिप मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष संतोष कोळी यांनी दिली.
यासंदर्भात मत्स्यव्यावसाय विभाग यांना घटनेची माहिती दिली असून नौका काढून टोचन करून घेऊन येण्याकरिता सहकार्य करण्यासाबंधी विनंती केली आहे. नेहमी अशा घटने वेळी शासनाने मदत केली पाहिजे, परंतू शासनाकडे तशी यंत्रणाचं नसून मच्छिमारांना वाऱ्यावर सोडले जाते अशी खंत संतोष कोळी यांनी व्यक्त केली.