मॅगी, टिपू, डॅनी, ध्रुव करताहेत रेल्वेची सुरक्षा, पोलिसांच्या श्वानपथकाला गरज अधिक श्वानांची
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 09:29 AM2023-11-26T09:29:26+5:302023-11-26T09:32:59+5:30
Mumbai: मुंबईची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय गाड्या तसेच सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, बांद्रा इत्यादी ठिकाणांहून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या यांच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी श्वानपथकावर असते.
मुंबई : मुंबईची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय गाड्या तसेच सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, बांद्रा इत्यादी ठिकाणांहून सुटणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्या यांच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी श्वानपथकावर असते. मॅगी, टिपू, डॅनी, ध्रुवसह २९ श्वान ही जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. मात्र, अपुऱ्या श्वानसंख्येमुळे त्यांची अनेकदा धावपळ होते. कधी त्यांना कुर्ला गाठावे लागते तर कधी थेट पनवेल, रोहा. सध्या प्रशिक्षण घेत असलेले ऑस्कर, जॅक, मॅक्स आणि डिझेल हे ताज्या दमाचे श्वान लवकरच या पथकात सामील होतील.
मुंबईत अलीकडे दंगली, बॉम्बस्फोट घडविण्याच्या निनावी कॉल्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेला सतत सतर्क राहावे लागते. निनावी कॉल दुर्लक्षून चालत नाही. एखादा धमकीचा कॉल आला की महत्त्वाच्या ठिकाणांची झाडाझडती सुरू होते. त्यातल्या त्यात लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्या या दहशतवाद्यांच्या दृष्टीने ‘सॉफ्ट टार्गेट.’ अशा कॉल्सनंतर श्वानपथकाची खरी कसोटी लागते. संपूर्ण परिसराची तपासणी हे श्वानपथक करते. नंतरच गाडी पुढे रवाना होते.
गुन्ह्यांचा छडा, अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी रेल्वे पोलिस दलात श्वानांची भरती करण्यात आली आहे.
कार्यक्षम पथक
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे संरक्षण दलाकडे श्वान पथकाकडे सुप्रशिक्षित स्निफर श्वानांची एक कार्यक्षम टीम आहे.
२९ कॅनाईन हीरो असून त्यापैकी १८ बॉम्ब आणि स्फोटके शोधण्यासाठी तैनात आहेत.
४ अमली पदार्थ शोधण्यासाठी आणि ७ गुन्ह्यांच्या तपासासाठी तैनात आहेत.
श्वान पथकातील ऑस्कर, मॅगी, टीपू, डॅनी, जिमी, जिवा, बाँड, शक्ती, ध्रुवा, मायकल, रॉकीसह ‘रुद्र’, ‘हिरा’ या लॅब्राडोर जातीच्या, तसेच ‘किरा’, ‘साशा’ या बेल्जियन श्वानांचा समावेश आहे.
श्वानांना माटुंगा, कर्नाक
बंदर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण येथे असलेल्या विशेष केनेल्समध्ये ठेवण्यात आले आहे.
अनेक श्वान निवृत्त
दहा वर्षांनंतर श्वान निवृत्त होतात. गेली काही दिवसांत अनेक श्वान निवृत्त झाले. निवृत्तीनंतर रिक्त झालेली जागा भरण्यासाठी आणखीन श्वानांची आवश्यकता असल्याचे काही हॅण्डलरचे म्हणणे आहे.
नुकतेच वाहन ताफ्यात
माटुंगा येथील श्वान पथकाच्या ताफ्यात आठ महिन्यांपूर्वीच श्वानांना पिकअप-ड्रॉपसाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली. यापूर्वी स्टेशनपासून जवळपास एक ते दीड किलोमीटरच अंतर पार पाडून श्वानांना रेल्वे स्टेशन गाठावे लागायचे. यामध्ये हॅण्डलरची देखील दमछाक व्हायची.