Join us

माहीम कोळीवाड्याला मिळणार नवी झळाळी, किल्ल्याचाही होणार जीर्णोद्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 11:04 AM

संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण, किल्ल्याचाही होणार जीर्णोद्धार.

मुंबई : पालिकेकडून मुंबईतील विविध विभागांमध्ये सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून माहीम कोळीवाडा येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेले विहार क्षेत्र व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. परिणामी माहीम किल्ला परिसर आणि सी-फूड प्लाझा येथे येणाऱ्या नागरिकांना तसेच पर्यटकांना सुखद अनुभव येईल, असा विश्वास पालिका व्यक्त करीत आहे.     माहीम कोळीवाडा येथील समुद्रकिनाऱ्याला पर्यटकांची खास पसंती असते. या समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच कोळीवाडादेखील आहे. दरम्यान, किनाऱ्यालगत असणाऱ्या विहार क्षेत्र व संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण करण्यासाठी वास्तू सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. या वास्तू सल्लागाराच्या आराखड्यानुसार विहार क्षेत्र व संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांपासून सागरी किनाऱ्याचे संरक्षण होण्यासाठी याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. 

कोळीवाडा येथील समुद्र किनाऱयालगत असलेल्या माहीम किल्ल्याची देखील दुरूस्ती आणि जीर्णोद्धाराचे काम करण्यात येणार आहे. किल्ल्याच्या पायऱयांवरील माती, भिंतीवरील जुने टाईल्स व प्लास्टर काढण्यात येणार आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर सुशोभीकरण कामाचा आराखडा तयार करून किल्ल्याची दुरूस्ती आणि जीर्णोद्धार सुरू करण्यात येणार आहे.

१३० मीटर लांबी आणि सुमारे अडीच फूट उंच असणाऱ्या या संरक्षक भिंतीला तिन्ही बाजूंनी सुशोभीकरण करण्यात येणार आहे.    

१) विहार क्षेत्राला लागून फूड प्लाझा बनविण्यात आला आहे. या ठिकाणीदेखील सुशोभीकरण करण्यात येणार आहे. 

२) जवळपास १३० मीटर लांबी आणि सरासरी १० मीटर रुंदी असलेल्या प्रशस्त अशा या विहार क्षेत्रावरून पर्यटकांना कोळीवाड्यातील महिला बचत गटांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत विस्तीर्ण अशा समुद्रकिनाऱ्याची भ्रमंती करता येणार आहे. 

कायमस्वरूपी प्रसाधनगृह आणि पाणी - पावसाळ्यात कोळीबांधवांना समुद्रात जाता येत नाही, अशावेळी त्यांच्या बोटी या विहार क्षेत्रावर ठेवता येतील.  येत्या काळात याठिकाणी अधिकाधिक सुविधा देतानाच विहित परवानगी प्राप्त करून कायमस्वरूपी प्रसाधनगृह आणि पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली आहे.

टॅग्स :मुंबईमाहीमगड