मुंबई : मद्यपान करणाऱ्यांना हुसकावले म्हणून मालवणी पोलिसांवर हल्ला
By गौरी टेंबकर | Published: May 23, 2023 11:45 AM2023-05-23T11:45:34+5:302023-05-23T11:45:57+5:30
यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आलीये.
मुंबई: सार्वजनिक ठिकाणी उशिरा रात्री मद्यपान करणाऱ्याना हुसकावून लावले या रागात मालवणी पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला असून यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून चौघांना अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मालाड पश्चिम च्या जनकल्याण नगर परिसरात मालवणी पोलिसांचे पथक मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास गस्तीवर होते. त्यावेळी चार ते पाच जण जनकल्याण नगर या ठिकाणी बसून मद्यपान करत होते. पोलिसांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या सर्वांना तिथून निघून जाण्यास सांगितले. मात्र त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच या पथकाला धक्काबुक्की करण्यात आली. त्यात एक पोलीस कॉन्स्टेबल देखील जखमी झाला आहे.
त्यानुसार चार जणांवर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. ज्यात एक जण हा अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. जखमी पोलिसाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.