खड्ड्यांमुळे तरुण मुलगा गमावलेल्या पित्यानं बुजवले 556 खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 05:49 PM2018-07-30T17:49:36+5:302018-07-30T17:54:34+5:30
खड्डे बुजवणाऱ्या पित्याला पाहून सर्वच हळहळले
मुंबई: शहरातील खड्डे सर्वसामान्यांसाठी जीवघेणे ठरत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. मात्र तरीही संपूर्ण शहर खड्ड्यात घालणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला जाग आलेली नाही. त्यामुळेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आपला तरुण मुलगा गमावणाऱ्या एका पित्यानं रविवारी शहरातील तब्बल 556 खड्डे बुजवले.
दादाराव बिल्होरे यांनी तीन वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा रस्ते अपघातात गमावला. सोळा वर्षांच्या प्रकाश बिल्होरेचा खड्ड्यांनी बळी घेतला. 28 जुलै 2015 रोजी प्रकाशचा जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर अपघात झाला. यामध्ये प्रकाशचा मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे प्रकाशसारखे आणखी बळी जाऊ नये, यासाठी प्रकाशचे वडील दादाराव बिल्होरे यांनी शहरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. त्यांनी काल (रविवारी) शहरातील 556 खड्डे बुजवले.
माझ्यासारखी परिस्थिती कोणावरही ओढावू नये असं मला वाटतं, अशी हृदय हेलावून टाकणारी प्रतिक्रिया प्रकाश बिल्होरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 'देश खड्डेमुक्त होईपर्यंत माझं काम सुरूच राहील. आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड आहे. देशातील लाखभर लोकांनी जरी खड्डे बुजवण्यास सुरुवात केली, तरीही देश खड्डेमुक्त होईल,' असं ते म्हणाले. अनेकदा खड्डे बुजवण्यावरुन महापालिका आणि एमएमआरडीए एकमेकांकडे बोट दाखवतात. याबद्दल बोलताना सामान्य माणसानं खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतल्यास या दोन्ही यंत्रणांना जाग येईल, असं बिल्होरे म्हणाले.