आपल्याकडे सध्या 'कोल्डप्ले' कॉन्सर्टचं जोरदार वारं वाहतंय. इन्स्टाग्रामवर नुसतं 'कोल्डप्ले'च्या कॉन्सर्टचेच रिल धुमाकूळ घालताहेत. ब्रिटनच्या या बँडची क्रेझ इतकी होती की चाहत्यांनी शोच्या तिकीटासाठी लाखो रुपये मोजले होते. मुंबईनंतर नुकताच 'कोल्डप्ले'चा कॉन्सर्ट गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाला. याही कॉन्सर्टला तुफान गर्दी झाली होती. देशातील विविध राज्यांतून अनेक कोल्डप्ले फॅन्स गुजरातमध्ये आले होते. यातच मुंबईतील शोचं तिकीट न मिळालेल्या एका फॅनला अहमदाबादच्या शोचं तिकीट मिळालं होतं. त्यासाठी त्यानं मुंबई ते अहमदाबाद असा प्रवासही केला. पण तिथं पोहोचल्यानंतर त्याला आठवलं की कॉन्सर्टचं तिकीट तो घरीच विसरलाय. इथंच सगळा बट्ट्याबोळ झाला. एक्सवर एका यूझरनं त्याच्या मित्रासोबत घडलेला हा प्रसंग शेअर केलाय.
"माझा एक मित्र कोल्डप्लेच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी मुंबई-अहमदाबाद ट्रेनमध्ये बसला आणि पोहोचल्यावर त्याला कळलं की आपण शोचं तिकीट घरीच विसरलोय", असं ट्विट एका यूझरनं केलं आहे. त्यावर हजारोंनी लाइक्स मिळालेत. तर अनेकांनी धमाल कमेंट्सही केल्यात. अतिशय बालिश चूक असल्याचं एकानं म्हटलंय तर काहींनी कमशीबी असल्याचं म्हटलंय. काहींनी तर 'विसरभोळा गोकूळ'ला कॉन्सर्ट आता स्टेडियमबाहेरुनच ऐकण्याचा सल्ला दिला. पण दैवबलवत्तर म्हणतात ना तसंच काहीसं घडलं. त्याला कॉन्सर्टला उपस्थित राहता आलं तेही तिकीट दाखवून.
एक स्पीड कुरियर अन् जीवात जीव!'कोल्डप्ले'चं तिकीट घरीच विसरल्याचा किस्सा इतका व्हायरल झाला की विचारुन सोय नाही. पण खरी गंमत तर पुढे घडली. त्याच ट्विटवर रिप्लायमध्ये मित्रच कसा मित्रासाठी धावून येतो हे यूझरनं दाखवून दिलं. मित्रानं स्पीड कुरियरनं तिकीट पाठवून दिलं आणि गुजरातला पोहोचलेल्या पठ्ठ्यानं थेट कुरियर ऑफीसमध्ये जाऊन ते घेतलं. तिकीट मिळाल्याचा फोटो काढून त्यानं मित्राला व्हॉट्सअॅप केला आणि अशाप्रकारे कोल्डप्ले फॅनच्या 'विसरभोळ्या गोकूळ'च्या जीवात जीव आला. व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉटही एक्सवर पोस्ट करण्यात आलाय.