मुंबईत दादर मार्केटजवळ प्रवाशानं टॅक्सी चालकाला पेव्हर ब्लॉकनं ठेचलं, जागीच मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 03:02 PM2021-05-24T15:02:32+5:302021-05-24T15:07:17+5:30
रिक्षा किंवा टॅक्सी चालक भाडं नाकारल्यामुळे प्रवासांसोबत होणारे वाद आणि हाणामारीच्या घटना मुंबईकरांसाठी काही नवीन नाहीत. पण रविवारी पहाटे मुंबईत दादर मार्केट येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
रिक्षा किंवा टॅक्सी चालक भाडं नाकारल्यामुळे प्रवासांसोबत होणारे वाद आणि हाणामारीच्या घटना मुंबईकरांसाठी काही नवीन नाहीत. पण रविवारी पहाटे मुंबईत दादर मार्केट येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाडं नाकारल्याच्या रागातून एका प्रवाशानं टॅक्सी चालकाची पेव्हर ब्लॉकनं ठेचून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाचं टॅक्सी चालकानं भाडं नाकारलं म्हणून त्याच्याशी भांडण झालं. वाद इतका विकोपाला पोहोचला की प्रवाशानं सीमेंटच्या पेव्हर ब्लॉकनं टॅक्सी चालकाला ठेचलं. टॅक्सीचालकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
३० वर्षीय आरोपी बसवराज मेलिनमानी हा मूळ कर्नाटकातील विजयनगरचा रहिवासी आहे. सध्या तो दादरमधील सेनापती बापट मार्गावर आंबेडकर नगर भागात राहतो. दादर मार्केट परिसरातच त्याने मद्यपान केले. त्यानंतर संबंधित टॅक्सी चालकाला त्याने आपल्या घरी सोडण्यास सांगितलं. ५४ वर्षीय टॅक्सी चालक छबिराज जैस्वार यांनी भाडं नाकारलं. यावरुन दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. दोघांमध्ये झालेल्या वादावादीत टॅक्सी चालक फूटपाथवर पडला. याचवेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बसवराजने जवळ पडलेले तीन पेव्हर ब्लॉक्स उचलले आणि जैस्वार यांच्या डोक्यावर आदळले.
सकाळी साडेसहाच्या सुमारास स्थानिक रहिवाशांनी टॅक्सीचालकाला रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. त्यांनी तातडीने पोलीस कंट्रोल रुमला याविषयी माहिती दिली. त्यानंतर दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी टॅक्सी चालकाला सायन रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. मयत टॅक्सी चालक मानखुर्द भागात कुटुंबासोबत राहत होता. दादर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आरोपी बसवराज मेलिनमानी याला बेड्या ठोकल्या.