मुंबई - मोबाइल चोराचा पाठलाग करताना लोकलमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड स्टेशनवर रविवारी (8 जुलै) सकाळी ही घटना घडली. शकील अब्दुल गफार शेख असे या प्रवाशाचे नाव आहे. शकील यांना दोन मुलं आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेटला जाण्यासाठी शकील यांनी रविवारी सकाळी धिमी लोकल पकडली. त्यावेळी त्यांचे काही सहकारी ही लोकलमध्ये होते. एक अज्ञात व्यक्ती डब्यात शिरला. लोकल 6.45 च्या सुमारास चर्नी रोड स्थानकात पोहचली त्यावेळी चोराने शकील यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेत पळ काढला. धावत्या लोकलमधून तो प्लॅटफॉर्मवर उतरला आणि पळाला.
शकील यांनी चोराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान लोकलने वेग घेतला होता. चोराला पकडण्यासाठी ते धावत्या ट्रेनमधून उतरले. मात्र वेगाचा अंदाज न आल्याने प्लॅटफॉर्म आणि लोकल यांच्या पोकळीत पडले. यामध्ये शेख यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.