मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:15 IST2025-04-19T13:14:15+5:302025-04-19T13:15:40+5:30
Mumbai Crime: मनोज यांची पत्नी शुभांगी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, एकाच इमारतीत राहणाऱ्या घुगलसोबत मनोजची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती.

मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या रकमेवर १० ते ५० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत दलालाने फसवणूक केल्याच्या तणावातून भांडुपमधील मनोज भोसले (वय ३८) याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. तत्पूर्वी मनोजने पत्नीला ऑडिओ, व्हिडीओ क्लिप पाठवून फसवणुकीला कंटाळून जगण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी याप्रकरणी दलाल जय घुगल याच्याविरोधात फसवणूक, आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
मनोज यांची पत्नी शुभांगी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, एकाच इमारतीत राहणाऱ्या घुगलसोबत मनोजची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. घुगलने त्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास १० ते ५० टक्के व्याज मिळण्याचे आमिष दाखवले.
मनोजने २३ लाख रुपये घुगलकडे शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यासाठी दिले. सुरुवातीचे काही दिवस घुगलने व्याज दिले. त्यानंतर व्याज देणेही बंद केले. घुगलने अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे समजले.
सहा महिन्यांपूर्वी घुगल गायब झाला. अखेर मनोजने भांडुप पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी शोध सुरु केला, मात्र त्यांच्या हाती तो लागला नाही.
कुटुंबीयांसमोरच झाडली स्वतःवर गोळी
१६ एप्रिलला मनोज दुपारी कळव्याला गेला. रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. त्यानंतर त्याने व्हॉट्सॲपवर ऑडिओ, व्हिडीओ क्लिप पाठवत कुटुंबाची काळजी घेण्याचे संदेश पाठवले.
कुटुंबीयांनी इमारतीजवळ शोध सुरू केला. तेव्हा, इमारतीच्या जवळच दिसून आला. त्याच्या हातातील बंदूक बघून कुटुंबीयांना धक्का बसला.
‘घुगल माझे पैसे घेऊन पळून गेला, मला सर्वजण बोलतात. मला कंटाळा आला असून मला मरायचे आहे, असे बोलत होता. त्याच्याकडील बंदूक हिसकावण्याचा नातेवाइकांनी प्रयत्न केला.
त्याला अन्य नातेवाइकांच्या मदतीने समजावून घराकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो इमारतीचे जिने चढत असतानाच तेथून पळत मागे जाऊन स्वतःवर गोळी झाडून घेतली.
बंदूकदेखील दलालानेच दिली
बंदूक देखील दलालानेच पळून जाण्यापूर्वी मनोजला दिली होती, असे दोन महिन्यांपूर्वी पत्नीला सांगितले होते.
मात्र ती बंदूक कुठे ठेवत होता? याबाबत माहिती नसल्याचेही पत्नीने जबाबात म्हटले आहे.