Join us

मुंबई ते मांडवा रो-रो सेवा आजपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 2:45 AM

या सेवेमुळे अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमधील चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक होणार आहे.

अलिबाग : मुंबई ते मांडवा या सागरी मार्गावरील रो-रो सेवा सुरू होण्यास अखेर मुहूर्त सापडला. गुरुवार, २० आॅगस्टपासून रो-रो सेवा सुरू होत असल्याने नागरिकांना या सेवेचा अधिक उपयोग होणार आहे. या सेवेमुळे अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमधील चाकरमान्यांचा प्रवास सुखकारक होणार आहे.१५ मार्चला ही सेवा घाईघाईत सुरू करण्यात आली. दरम्यान, कोरोना संकट गडद झाल्यामुळे काही काळ ही सेवा स्थगित करण्यात आली. मात्र चाकरमान्यांच्या वाहनांची रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी गुरुवारपासून ही सेवा आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी ९.१५ वाजता व्यावसायिक तत्त्वावर प्रवाशांची पहिली बोट मुंबईतील भाऊचा धक्का येथून मांडवा बंदराकडे निघणार आहे. हीच बोट दुपारी ४ वाजता मांडवा येथून परतीचा प्रवास करेल. हे वेळापत्रक ३० आॅगस्टपर्यंत कायम राहणार आहे.मुंबई-मांडवा या १९ किलोमीटरच्या सागरी मार्गावर रो-रो सेवा देण्याचा करार बंदर विभागाने एमएम कंपनीशी केला आहे. यासाठी आवश्यक असलेल्या मांडवा येथील जेट्टीचे काम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते.