Join us

Mumbai: मॅनहोलवरील झाकणे उघडी ठेवणारे, चोरणारे आता पालिकेच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 12:48 PM

Mumbai: भुयारी गटारांवरील झाकणे (मॅनहोल) उघडी राहिल्यामुळे त्यात पडून दोन कामगारांचे बळी गेल्यावर महपालिकेला अखेर जाग आली असून प्राणहानी होण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलणार असे जाहीर केले आहे.

मुंबई : भुयारी गटारांवरील झाकणे (मॅनहोल) उघडी राहिल्यामुळे त्यात पडून दोन कामगारांचे बळी गेल्यावर महपालिकेला अखेर जाग आली असून प्राणहानी होण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलणार असे जाहीर केले आहे. भुयारी गटारांवरील झाकणे उघडी राहिल्यास त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच ही झाकणे चोरणाऱ्यावर गुन्हे दाखल करू असा दम भरला आहे.

पावसाळ्यात मुंबईत सखल भागात पाणी साचते. त्याचा लवकर निचरा होत नाही. परिणामी उघड्या मॅनहोलमध्ये पडून जीव जाण्याचे प्रकार पहिल्याच पावसात घडले. हे प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने मॅनहोलवरील झाकणांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे ठरवले आहे. उच्च न्यायालयानेही वेळोवेळी यावरून पालिका प्रशासनाचे कान उपटले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने सोमवारी परिपत्रक जारी केले. त्यानुसार भुयारी गटारांवरील तसेच मलजल वाहिन्यांवरील झाकण उघडणे हा दंडनीय गुन्हा ठरविण्यात आला आहे. तसेच गटारांवरील झाकणांबाबत नागरिकांनी काय दक्षता बाळगावी याच्या सूचनाही पालिकेकडून जारी करण्यात आल्या आहेत. तक्रारींसाठी महापालिकेची नजीकची चौकी वा विभागीय कार्यालय वा १९१६ या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झाकणे काढणाऱ्या किंवा चोरीच्या प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पायाभूत सुविधा विभागाचे उपायुक्त उल्हास महाले यांनी दिली आहे.

 पालिकेचे आवाहन... महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणीही मॅनहोलवरील वा अन्य जलनिःसारण वाहिनींवरील झाकण उघडू नये. झाकण उघडल्यास त्यात नागरिक अथवा वाहने पडून गंभीर अपघात होऊ शकतो. महापालिकेच्या अधिकृत कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणीही झाकण उघडणे हा दंडनीय अपराध आहे. अशा परिस्थितीत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

तक्रार कुठे कराल?मलवाहिनीवरील/पर्जन्य-जलनिःसारण वाहिनींवरील झाकण उघडे आढळल्यास अथवा अधिकृत कर्मचाऱ्यांशिवाय इतर व्यक्ती झाकण उघडत असल्यास अथवा चोरीला गेलेले डी.आय. / सी.आय. बनावटीचे झाकण खरेदी-विक्री करीत असल्यास नागरिकांनी नजीकचे महानगरपालिका चौकी / विभागीय कार्यालय अथवा महानगरपालिका आपत्कालीन नियंत्रण कक्ष (१९१६) व खालील क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

झाकणे चोरणे गुन्हाच : हायकोर्टमॅनहोल्सवरील झाकणे चोरीला जाणे हा गंभीर गुन्हा आहे. मुंबई महापालिकेने याबाबत पोलिसांकडे रीतसर तक्रार करावी, नागरिकांनीही जागरूक असावे. त्यांनीही उघडी मॅनहोल्स दिसली की तक्रार करावी, असे सांगत आतापर्यंत पालिकेने मॅनहोल्सचे झाकण चोरीला गेल्याबद्दल तक्रारी केल्या आणि पोलिसांनी किती जणांवर कारवाई केली, याची माहिती महिनाभरानंतर सादर करावी, अशा सूचना उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये मॅनहोल्ससंदर्भात दिलेल्या आदेशांची अद्याप पूर्तता न झाल्याने रुजू ठक्कर यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रभारी मुख्य न्या. नितीन जामदार व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे होती. सोमवारी त्यावर सुनावणी झाली.  महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी बाजू मांडली. 

टॅग्स :मुंबई