मुंबई : शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेक बेस्ट बसगाड्यांचे मार्ग वळवण्यात आले. एलबीएस रोड, विनोबा भावे मार्ग, गांधी मार्केट, दहिसर सब-वे, अंधेरी सब-वे, एस. व्ही. रोड जोगेश्वरी, टिळक रोड, मालाड साईनाथ सब-वे, शिवसृष्टी, कुर्ला सिग्नल, वडाळा रेल्वे स्थानक, बोरिवली पूर्व, संगमनगर, अशा अनेक मार्गावरून बस वळविण्यात आल्या. यामुळे लोकल सेवा ठप्प झाल्याने बस प्रवासाकडे वळलेल्या प्रवाशांचे हाल झाले. वाहतूक कोंडीमुळे अनेक ठिकाणी बसही अडकून पडल्या होत्या. बेस्ट प्रवाशांना तासन् तास थांब्यावर भर पावसात ताटकळत उभे राहावे लागले.
अनेक बस आगारातच
१७ मार्गावरील ४३ बसेसचे मार्ग वळवले. तर ठिकठिकाणी ३० बसेस अडकून पडल्या होत्या. सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढल्यानंतर ४ मार्गावरील जवळपास ९ बसेसचे मार्ग वळविण्यात आले.
हिंदमाता जंक्शन, मालाडमधील साईनाथ सब-वे, गांधी मार्केट येथे पाणी साचल्यामुळे बस वळवण्यात आल्या होत्या. अनेक चालक-वाहक कामावरच येऊ शकले नाहीत.
एसटीचा दिलासा
हार्बर रेल्वे मार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटीने विशेष गाड्या सोडल्या होत्या. मेल, एक्स्प्रेस रद्द केल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी भिवंडी, ठाणे, रायगड, चिपळूण, रत्नागिरी या बसेस छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरून सोडण्यात आल्या.