दोन तीन दिवसांपूर्वीच मुंबईला गेलो होतो. आपल्या मराठी भाषेचा वापर मुंबईमध्ये किती होतो हे अनुभवले आणि फार वाईट वाटले. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. दादर, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, वांद्रे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा काही स्थानकांमध्ये मराठी भाषा क्वचितच ऐकायला मिळाली. मग प्रश्न पडला की मराठी माणूस मुंबईत आहे की नाही ?
रेल्वे स्टेशनवरील दुकानांमध्ये मराठी माणसाचे दुकान भेटणे म्हणजे वाळवंटात पाण्याची विहीर भेटण्यासारखेच! बाकीचे लोक तर आपापल्या भाषेत बिनधास्त बोलत असतात पण आपला मराठी माणूस? - नाव नको ! भैया स्टेशन छोडोगे क्या, सब्जी कैसे दिया इथूनच सुरुवात करतो... मग कशी टिकेल मराठी?
माझ्यासोबत माझा मित्र पण होता सूरज. त्याला न राहवून मी विचारले, की मुंबईत मराठी माणूस आहे की नाही? त्यालाही हाच प्रश्न पडला असावा बहुतेक. आपला मराठी माणूस फक्त मराठी भाषा दिवस आला की स्टेटस पुरते मराठी प्रेम गाजवतो. प्रत्यक्षात मात्र त्याला विसर पडलाय की आपली भाषा मराठी आहे. हिंदी, इंग्लिश बोलण्यात आपला मराठी भैया स्वतःला धन्य समजतो हे मात्र नक्की. मराठी टिकवायची असेल तर सुरुवात आपल्यापासूनच झाली पाहिजे, नाहीतर मुंबईमध्ये मराठी संपायला वेळ लागणार नाही.- प्रथमेश खरवडे