मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक शांततेत पार : एकूण २५ टक्के मतदान, ८ ऑक्टोबरला निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:08 AM2021-09-27T04:08:09+5:302021-09-27T04:08:09+5:30
मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची पंचवार्षिक निवडणूक २०२१-२०२६ रविवारी कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून घेण्यात आली. ही निवडणूक सर्वच ठिकाणी ...
मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची पंचवार्षिक निवडणूक २०२१-२०२६ रविवारी कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून घेण्यात आली. ही निवडणूक सर्वच ठिकाणी अतिशय चुरशीची आणि अटीतटीची झाली. सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली, या निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबर २०२१ रोजी लागणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी दिली आहे. निवडणुकीत एकूण २५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत नायगाव शाखेत ७, बोरिवली शाखेत ५, श्रीकृष्णनगर शाखेत २, गोरेगावमध्ये २ आणि मध्यवर्ती शाखेत २, अशा एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक झाली. यात सुप्रिया सुळे, अनिल देसाई, आमदार कालिदास कोळंबकर, माजी आमदार विद्याताई चव्हाण, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, नगरसेवक पड्याळ आदी मान्यवरांनी मतदान केले.
निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी सांगितले की, मतदानासंदर्भात काही शंकाकुशंका असतील, तर विहित कालावधीत उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत दाद मागण्याची मुभा असते. त्यासंदर्भात तपासणी व चौकशी करण्यात येते. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात येतो.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा नायगाव शाखा
परिसराला पोलीस छावणीचे रूप
पोलीस बळाचा दुरुपयोग असल्याची आजीव सभासद असलेल्या आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी टीका केली आहे. विशेष म्हणजे अधिकांश मतदारांना निवडणूक असल्याची माहिती न देण्यात स्वारस्य घेण्यात आल्याचेही गलगली यांनी म्हटले आहे. निवडणूक अधिकारी आणि संग्रहालयाची भूमिका मतदान कमी करण्याच्या दृष्टीने होती आणि त्यास पोलिसांचा फौजफाटा कारणीभूत ठरला; अन्यथा मतदान इतके कमी झालेच नसते, असेही गलगली यांनी नमूद केले आहे.
..........
नायगाव शाखेत रविवारी नायगाव शाखेच्या सात जागांसाठी निवडणूक होती. या निवडणुकीची पूर्वकल्पना अधिकांश मतदारांना निवडणूक अधिकारी असो किंवा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे देण्यात आली नाही. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तर प्रचंड पोलीस बंदोबस्त होता आणि प्रवेद्वारापासून ते मतदान केंद्रावर पोलीस तैनात करण्यात आले होते.