मुंबई – कोरोनामुळे ग्रंथालय संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरुन काढण्यासाठी बराच कालावधी लागेल. परिणामी ही स्थिती पाहता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने आर्थिक संजीवनीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन सढळहस्ते मदत करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
कोरोनामुळे मार्च ते ऑक्टोबर या काळात ग्रंथालय पूर्णतः बंद होती. परिणामी या काळात वर्गणी, देणगीच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न बुडाले. त्यामुळे ग्रंथालये आर्थिक संकटात सापडली आहेत. १५ ऑक्टोबरपासून शासन आदेशानुसार ग्रंथालये चालू झाली. ग्रंथालयाने सुरू केलेले अंकीकरण प्रकल्प, डिजिटल कॉर्नर, संगणकीकरण आधी कामे निधीअभावी ठप्प झाली. दैनंदिन खर्च भागवताना सुरक्षित गंगाजळी अटत चालली आहे. त्यामुळे दानशूर व संस्थेवर प्रेम करणाऱ्या ग्रंथालय वारसा जपणाऱ्या सर्वांना त्या पत्रकाद्वारे सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन ग्रंथालयाच्या वतीने कार्यवाह प्रेमानंद भाटकर यांनी केले आहे