लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार गुरुवारी जाहीर झाले. हे पुरस्कार येत्या ६ जानेवारी रोजी चंद्रकांत वानखडे यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी गुरुवारी हे पुरस्कार जाहीर केले.
दैनिक अजिंक्य भारतचे राजकीय संपादक प्रमोद चंचूवार यांना ‘युगारंभकार सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती’ पुरस्कार, मुक्त संवादचे सल्लागार संपादक शेखर देशमुख यांना ‘समतानंद अनंत हरी गद्रे’ पुरस्कार, इकॉनॉमिक टाइम्सचे छायाचित्रकार नितीन सोनावणे यांना दिवंगत अधिक शिरोडकर पुरस्कृत ‘तोलाराम कुकरेजा’ पुरस्कार, दैनिक रामप्रहरचे उपसंपादक सुधाकर जगताप यांना ‘भालचंद्र खांडेकर स्मृती’ पुरस्कार आणि आपलं महानगरचे विनायक डिगे यांना शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर’ पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच झी २४ तासचे कृष्णात पाटील यांना मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तान्त, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा ‘आप्पा पेंडसे पत्रकारिता’ पुरस्कार, दूरदर्शनचे वृत्तसंपादक डॉ. नरेंद्रकुमार विसपुते यांना ‘जयहिंद प्रकाशन’ पुरस्कार, दिव्य मराठीचे प्रशांत पवार यांना कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘सरमळकर’ पुरस्कार, नीला उपाध्ये यांना ‘विद्याधर गोखले’ पुरस्कार, न्यूज २४ चे विनोद जगदाळे यांना उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तान्ताबद्दल दिला जाणारा ‘रमेश भोगटे स्मृती’ पुरस्कार आणि दैनिक सामनाच्या मेघा गवंडे यांना शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी दिला जाणारा ‘विश्वनाथराव वाबळे स्मृती’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
दरवर्षी २१ जून रोजी पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा केला जातो. मात्र कोरोनामुळे हा समारंभ होऊ शकला नाही. त्यामुळे वर्धापन दिनाचे आणि पत्रकार दिनाचे पुरस्कार एकत्रितपणे ६ जानेवारी रोजी देण्यात येणार आहेत.