आफ्रिकन धावपटूंवर असणार लक्ष, रविवारी रंगणार मुंबई मॅरेथॉन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 03:07 AM2018-01-20T03:07:02+5:302018-01-20T03:07:06+5:30
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई मॅरेथॉनची चुरस रविवारी पहाटे ५.४० वाजल्यापासून रंगणार असून भारतीय गटामध्ये सेनादलाच्या धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगणार असल्याचे स्पष्ट आहे
मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई मॅरेथॉनची चुरस रविवारी पहाटे ५.४० वाजल्यापासून रंगणार असून भारतीय गटामध्ये सेनादलाच्या धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगणार असल्याचे स्पष्ट आहे. त्याचवेळी, एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंसह बहारीन आणि अमेरिकेच्या धावपटूंमध्येही कडवी स्पर्धा रंगेल.
यंदाचे १५वे वर्ष असलेल्या या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सुमारे ४४ हजाराहून अधिक धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. मुख्य मॅरेथॉन एलिट गटातील चार खेळाडूंची २ तास ७ मिनिटापेक्षा कमी वेळेची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवली असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. शिवाय यंदा मुंबई मॅरेथॉनमधील विक्रमही मोडला जाण्याची तीव्र शक्यता वर्तविण्यात येत आहे. २०१६ साली केनियाच्या गिदोन कीपकिटर याने २ तास ८ मिनिटे ३५ मिनिटांची वेळ देत स्पर्धा विक्रम नोंदवला होता. त्यामुळेच स्पर्धा विक्रम मोडण्यात आघाडीवर आहे इथियोपियाचा सोलोमन देकसिया. त्याने २:०६:२२ अशी सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यापुढे चेले देकासा (इथियोपिया, २:०६:३३), शुमी देकासा (बहारीन, २:०६:४३) व अब्राहम गिरमा (इथियोपिया, २:०६:४८) यांचेही कडवे आव्हान असेल.
महिलांमध्ये केनियाची गतविजेती बोर्नेस कितुर आपले जेतेपद कायम राखण्यासाठी धावेल. तिला अमाने गोबेना (इथियोपिया), शुको गेनेमो (इथियोपिया), हेलालिआ जाहानेस (नामिबिया) व मोनिका स्टेफानोविस (पोलंड) या धावपटूंचे तगडे आव्हान असेल.
टी. गोपी याच्यावर नजरा
भारतीय धावपटूंमध्ये सेनादलाच्या गोपी थोनाकल याच्यावर सर्वांच्या नजरा असतील गतवर्षी आशियाई अजिंक्यपद पटकावलेला गोपी यंदा आफ्रिकन धावपटूंना टक्कर देऊ शकतो
अशी चर्चा आहे. त्याचप्रमाणे नितेंदर
सिंग रावत, कालिदास हिरवे, बलिअप्पा एबी, बहादूर सिंग धोनी यांसारख्या राष्ट्रीय धावपटूंचेही कडवे आव्हान गोपीपुढे असेल. महिलांमध्ये आॅलिम्पियन सुधा सिंग संभाव्य विजेती मानली जात असून पारुल चौधरी, मंजू यादव, महाराष्ट्राची मोनिका राऊत तिच्यापुढे आव्हान निर्माण करतील.
विशेष लोकल
पश्चिम रेल्वे दोन विशेष लोकल चालवणार आहे. पहिली लोकल विरार येथून रात्री २.४५ मिनिटांनी सुटणार असून चर्चगेट येथे ४.२३ वा. पोहचेल. दुसरी लोकल विरार येथून रात्री ३.०५ मिनिटांनी सूटणार असून चर्चगेटला ४.४३ वा. पोहचेल. कल्याणवरुन रात्री ३ वाजता लोकल निघणार असून सीएसएमटी येथे पहाटे ४.३० वा. पोहचेल. पनवेल स्थानकातून ३ वाजून १० मिनिटांनी निघणारी लोकल सीएसएमटी येथे ४.३० मिनिटांनी पोहचेल.
अशी असेल व्यवस्था...
स्पर्धा आयोजकांनी मॅरेथॉन मार्गावर धावपटूंसाठी चोख व्यवस्था केली असून यावेळी सहभागी स्पर्धकांसाठी एकूण १.५ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, मार्गावर एकूण २७ पाण्याचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. दोन बेस कॅम्पसह एकूण १२ वैद्यकीय केंद्रही उभारण्यात येणार असून ११ रुग्णवाहिकाही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. संपूर्ण मार्गावर ५०० डॉक्टर्स स्पर्धकांची काळजी घेण्यास सज्ज असतील. त्याचप्रमाणे एकूण ९ हजार पोलिसांचा फौजफाटा, १६०० सुरक्षा रक्षक आणि १४०० स्वयंसेवकही तैनात असतील.
पहिल्यांदाच १० किमी शर्यत
यंदाच्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच १० किमी अंतराच्या स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. एकूण ४ लाख ५ हजार अमेरिकी डॉलर रक्कमेचे पारितोषिक असलेल्या या धनाढ्य मॅरेथॉनमध्ये मुख्य मॅरेथॉनसह अर्धमॅरेथॉन (२१ किमी), ड्रीम रन (६.६ किमी), वरिष्ठ नागरिक गट (४.६ किमी) आणि चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी (२.४ किमी) या गटातही चुरस रंगेल.
मॅरेथॉन वेळापत्रक
: मुख्य मॅरेथॉन (हौशी) :
सकाळी ५.४० वाजता. सीएसएमटी येथून.
: मुख्य मॅरेथॉन (एलिट) :
सकाळी ७.१० वाजता. सीएसएमटी येथून.
: अर्ध मॅरेथॉन :
सकाळी ५.४० वाजता. वरळी डेअरी येथून.
: १०के रन :
सकाळी ६.१० वाजता. सीएसएमटी येथून.