मुंबई मॅरेथॉन १७ जानेवारीला रंगणार
By admin | Published: January 7, 2016 01:48 AM2016-01-07T01:48:59+5:302016-01-07T01:48:59+5:30
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनची रंगत १७ जानेवारीला रंगणार आहे. यंदाचे स्पर्धेचे १३वे वर्ष असून
मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनची रंगत १७ जानेवारीला रंगणार आहे. यंदाचे स्पर्धेचे १३वे वर्ष असून यावेळी देशातील तसेच जगभरातील अव्वल धावपटूंमधील चुरस पाहण्यास मुंबईकर सज्ज झाले आहेत.
स्पर्धेच्या पहिल्या वर्षांपासून या मॅरेथॉनमधील स्पर्धकांची संख्या सतत वाढत आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४० हजार २८५ धावपटूंनी मुंबई मॅरेथॉनमधील आपला सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये ५ हजार धावपटू पूर्ण मॅरेथॉनसाठी धावणार असून अर्धमॅरेथॉनसाठी १४ हजार ४३१ धावपटूंचा सहभाग निश्चित झाला आहे. त्याचप्रमाणे सर्वाधिक लक्षणीय ठरणाऱ्या ड्रीम रन, कॉर्पोरेट चॅम्पियन्स, वरिष्ठ नागरिक, अपंग आणि पोलिस कप या गटातही मोठ्या संख्येने धावपटूंनी सहभाग नोंदवला आहे.
यंदा आयोजकांनी पूर्ण मॅरेथॉनसाठी नवीन नियम केला असून यानुसार सहभागी धावपटूला पूर्ण मॅरेथॉन पुर्ण करणे अनिवार्य असेल. शिवाय पुर्ण व अर्ध मॅरेथॉन यशस्वीरीत्या पुर्ण करणाऱ्या पहिल्या हजार धावपटूंना आयोजकांच्या वतीने विशेष टी-शर्ट देण्यात येणार आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी मॅरेथॉन असलेल्या या स्पर्धेत एकूण ३ लाख ७७ हजार डॉलर रक्कमेच्या बक्षिसांची खैरात होणार आहे. शिवाय या स्पर्धेत जागतिक दर्जाचे अव्वल धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याने स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. जॅक्सन किपरॉप, वेलेंटाइन किपकेटर यांसारखे बलाढ्य धावपटू विजेतेपदासाठी धावतील. भारतीय खेळाडूंमध्ये ओपी जैशा, सुधा सिंग आणि ललिता बाबर या आगामी आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या धावपटूंवर विशेष लक्ष असेल.