मुंबई - इंडियन हेरिटेज सोसायटी यांच्या वतीने आयोजित मुंबई संस्कृती फेस्टिव्हल २०२३ येथे बंदोबस्तासाठी असताना पोलिस हवालदार कांचन प्रमोद भिसे (४६) या रविवारी चक्कर येऊन कोसळल्या. रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथे उपचादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. सकाळी मॅरेथॉनच्या बंदोबस्तावर असताना त्यांनी मुंबई मॅरेथॉनचा आंतरराष्ट्रीय ॲम्बेसिडर आणि जमैकाचा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता धावपटू योहान ब्लेक याच्यासोबत घेतलेला त्यांचा सेल्फी अखेरचा ठरला.
भिसे या विशेष शाखांमध्ये कार्यरत होत्या. रविवारी रात्री ८ च्या सुमारास एमआरए मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या फेस्टिव्हलला बंदोबस्तासाठी तैनात होत्या. त्याच, दरम्यान अचानक चक्कर येऊन खाली पडल्या आणि त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. मात्र, उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. सकाळी त्या मुंबई मॅरेथॉनच्या बंदोबस्तासाठीही तैनात होत्या. सकाळी त्यांनी योहान ब्लेकसोबत फोटो काढून स्टेट्सलाही ठेवला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांसह पोलिस दलाला धक्का बसला आहे.