मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनची चुरस १५ जानेवारीला रंगणार आहे. यंदा भारताचा आॅलिम्पियन धावपटू खेता राम, मोहम्मद यूनिस आणि इलाम सिंग मुख्य आकर्षण ठरणार असून महिलांमध्ये ज्योती गवते, मोनिका राऊत मोनिका आठरे विजेतेपदासाठी एकमेकींना आव्हान देतील. त्याचप्रमाणे, इथोपियाचे आयेले अबशेरो आणि डिंकनेश मेकाश यांचे भारतीय धावपटूंपुढे तगडे आव्हान असेल. मेकाशने दोन वेळा मुंबई मॅरेथॉनमध्ये बाजी मारली असून त्याच्याकडे यंदाही संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. तर, आयेलेने स्पर्धेत २:०४:२३ अशी जबरदस्त वेळ देत आपली छाप पाडली आहे.एकूण ३ लाख ८४ हजार यूएस डॉलर इतकी मोठी बक्षिस रक्कम असलेल्या या मॅरेथॉनमध्ये यंदा ४२ हजारहून अधिक धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये पुर्ण मॅरेथॉनसाठी ६ हजार ३४२ धावपटू धावणार आहेत. तर, अर्ध आणि ड्रीम रनसाठी अनुक्रमे १४ हजार ६६३ आणि १९ हजार ९८० धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. तर, इतर वरिष्ठ गटासाठी ९२१, चॅम्पियन्स विथ डिसेबिलिटी गटात ४३३ आणि पोलीस कपसाठी ४० संघांची नोंदणी झाली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबई मॅरेथॉनची चुरस १५ जानेवारीला
By admin | Published: January 06, 2017 3:00 AM