मुंबईमध्ये बाजरीची तिप्पट आवक, गव्हाची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:20 PM2019-01-05T12:20:03+5:302019-01-05T12:20:36+5:30

बाजारगप्पा : एक महिन्यापूर्वी रोज २० ते ३० टन आवक होत होती, ती आता ८० ते १०० टन एवढी झाली.

In Mumbai market Bajara arrivals increases three times while wheat in arrivals decreases | मुंबईमध्ये बाजरीची तिप्पट आवक, गव्हाची आवक घटली

मुंबईमध्ये बाजरीची तिप्पट आवक, गव्हाची आवक घटली

googlenewsNext

- नामदेव मोरे ( नवी मुंबई )

हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमधील धान्य मार्केटमध्ये बाजरीची आवक तिप्पट झाली आहे. एक महिन्यापूर्वी रोज २० ते ३० टन आवक होत होती, ती आता ८० ते १०० टन एवढी झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांसह गुजरात व उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असून, प्रतिक्विंटल १८ ते २६ रुपये किलो दराने विक्री होत आहे. 
एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये १,७०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल दराने बाजरी विक्री होत होती.

थंडी सुरू झाल्यापासून आवक तिप्पट झाली असून, बाजारभावही क्विंटलला १०० रुपयांनी वाढले आहेत. सद्य:स्थितीमध्ये १,८०० ते २,६००  रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर व इतर ठिकाणांवरून बाजरी विक्रीला येत आहे. उत्तर प्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात आवक होत असून काही प्रमाणात गुजरातवरून आवक आहे. मुंबईत चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकरी व परराज्यातील व्यापारी बाजरी मुंबईत विक्रीसाठी पाठवू लागले आहेत. 

गव्हाचा दर क्विंटलमागे १०० रुपयांनी कमी झाला आहे. सद्य:स्थितीमध्ये नियमित वापरण्यात येणारा गहू  २,३०० ते २,७०० रुपये व लोकवन २,६०० ते ३,३०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. गव्हाची कमी होणारी आवक ही मुंबई बाजार समितीमध्ये चिंतेचा विषय बनला आहे. यापूर्वी ७०० ते ९०० टन आवक रोज होत होती; परंतु सद्य:स्थितीमध्ये फक्त ३०० ते ४०० टनची आवक होत आहे. आवक निम्म्यावर आल्याची विविध कारणे सांगितली जात आहेत. मुंबईमध्ये मॉल व इतर ठिकाणी गहू थेट जात असल्यामुळे तो बाजार समितीमध्ये येतच नसल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

या आठवड्यात तांदळाचा दर प्रतिक्विंटल १०० रुपयांनी वाढला आहे. तांदळाची आवकही २ हजार टनांवरून १,८०० टनांवर आली आहे. चांगल्या प्रतीचा तांदूळ २८ ते ४२ रुपये दराने विकला जात आहे. कोलम तांदळाची आवक वाढली असून, बाजारभाव क्विंटलमागे २०० रुपयांनी कमी झाला आहे. डाळींचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. मार्केटमध्ये सर्वाधिक आवक तूर डाळीची होत आहे.

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमधून रोज २०० ते २५० टन तूर डाळ विक्रीसाठी येऊ लागली आहे. आवक वाढल्यामुळे बाजारभाव प्रतिक्विंटल १०० रुपयांनी कमी झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये सद्य:स्थितीमध्ये ५,६०० ते ७,१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. हरभरा डाळीची आवक वाढली असून, भावही २०० रुपये क्विंटलने वाढले आहेत. रोज ५० ते ६० टन विक्री होत आहे. १०० टन मूग डाळीची रोज विक्री होत असून, एक महिन्यापासून होलसेल मार्केटमध्ये ६६ ते ८४ रुपये किलो भाव मिळत आहे.

राजस्थान व इतर ठिकाणांवरून मूग डाळ विक्रीसाठी येत आहे. मसूर डाळीचा दरही क्विंटलमागे १०० रुपयांनी कमी झाला आहे. मसूर मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. धान्य मार्केटमधील अपवाद वगळता सर्वच वस्तूंच्या दरामध्ये १५ दिवसांमध्ये चढ-उतार पाहावयास मिळत असून, मसाला मार्केटमध्ये सुकामेवा, साखर, गूळ, खजूर व इतर वस्तूंचे दर स्थिर आहेत.

Web Title: In Mumbai market Bajara arrivals increases three times while wheat in arrivals decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.