...अन् विधान परिषदेत मार्शलना केले पाचारण; सत्ताधारी-विरोधक आले आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 09:26 AM2024-07-11T09:26:59+5:302024-07-11T09:28:09+5:30
१० मिनिटांनंतरही गोंधळ न थांबल्याने उपसभापतींनी परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
मुंबई : राज्य सरकारने मराठा-ओबीसी आरक्षणावर ठेवलेल्या विशेष बैठकीकडे मंगळवारी विरोधकांनी पाठ फिरवल्याच्या मुद्द्यावर बुधवारी सत्ताधारी सदस्यांनी विधान परिषदेत वेलमध्ये उतरत मोठा गोंधळ घातला. त्यावर विरोधकांनीही वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आल्याने उपसभापतींनी मार्शलना बोलावले. मात्र, १० मिनिटांनंतरही गोंधळ न थांबल्याने उपसभापतींनी परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडून विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. राज्यात जातीय सलोखा बिघडून गावागावांत जातीय तेढ मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांसह महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि मार्ग काढावा, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली होती.
दहा मिनिटांत कामकाज गुंडाळले
उपसभापतींनी गोंधळात सभागृहाचे कामकाज १० मिनिटांत गुंडाळले. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचा २०२२-२३ सालाचा ६० वा वार्षिक अहवाल, सिडकोची कागदपत्रे व पुरवणी मागण्या पटलावर सादर करून कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
‘हे पुतना मावशीचे प्रेम’
सर्वपक्षीय पक्षप्रमुखांना पत्रव्यवहार केला. मात्र, विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. विरोधकांचे पुतना मावशीचे प्रेम यातून समोर आल्याची टीका दरेकर यांनी केली. त्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दरेकर यांना प्रत्युत्तर दिले. बैठकीपूर्वी मराठा-ओबीसी नेत्यांशी सरकारने परस्पर केलेल्या चर्चेची माहिती सभागृहाला देण्याची विनंती केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नाही, असे दानवे म्हणाले.