मुंबई : मध्य भारतासह महाराष्ट्राचे कमाल तापमान आता ३८ अंश नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने या पूर्वीच वर्तविला होता. त्यानुसार, राज्यात ठिकठिकाणी कमाल तापमान ३८ ते ३९ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आहे. विशेषत: सोलापूर, अमरावती, मालेगाव आणि अकोला येथील कमाल तापमान ३९ अंशावर दाखल झाले असून, मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशाच्या आसपास असले तरी वाढत्या कमाल तापमानामुळे हा आकडादेखील छत्तीशी गाठेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, सुर्याची प्रखर किरणे मुंबईकरांना तापदायक ठरत आहेत. शिवाय मुंबईत दिवसासह रात्रीच्या ऊकाड्यातही किंचित वाढ झाली आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काळात कमाल तापमानात आणखी वाढ होईल; आणि विशेषत: गुजरातसह दक्षिण भारताला कमाल तापमानाचे चटके अधिक बसतील. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात उन्हाळा आणखी तापदायक असणार आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाची नोंद ४० अंश होईल. राज्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ०.५ ते १ अंशाने अधिक नोंदविण्यात येईल. किमान तापमानात सरासरी ०.५ ते १ अंश एवढी वाढ नोंदविण्यात येईल. पूर्व पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्यप्रदेश, गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर दक्षिण कर्नाटक आणि लगतच्या परिसरात कमाल तापमानात अधिकची वाढ नोंदविण्यात येईल. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तरप्रदेश, झारखंडमध्ये हीच परिस्थिती राहील. -----------------
राज्यातील तापलेली शहरे
जेऊर ३८.२सोलापूर ३९.६परभणी ३८.४सांगली ३८.४जळगाव ३८.६मालेगाव ४०.४मुंबई ३३.७कोल्हापूर ३७.६अकोला ३९.६अमरावती ३९नागपूर ३८.६