मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध यशस्वी लढा देणाऱ्या मुंबईकरांना पुढल्या आठवड्यात गुडन्यूज मिळू शकते. कोरोना रुग्णांचा कमी होणारा आकडा आणि रिकव्हरी रेटमध्ये सातत्यानं होणारी सुधारणा यामुळे मुंबई महापालिकेनं निर्बंधातून सूट देण्याचा विचार सुरू केला आहे. या आठवड्यात कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. आसपासच्या शहरांमधील परिस्थितीदेखील नियंत्रणात राहिल्यास आम्ही कोविड टास्क फोर्सशी संवाद साधू. त्यानंतर सध्या लागू असलेले थोडे निर्बंधदेखील शिथिल होतील. पुढील आठवड्यापर्यंत निर्बंध हटवण्याची परवानगी मिळेल, असं काकाणी यांनी सांगितलं.
आम्ही मुंबईतील कोरोना परिस्थितीची माहिती टास्क फोर्ससमोर ठेवू. त्यावर अंतिम निर्णय राज्य सरकार घेईल. कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या पाहता फेब्रुवारीत मुंबई अनलॉक होऊ शकते. मात्र यानंतरही मुंबईकरांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं लागेल, असं काकाणी म्हणाले.
सोमवारी (काल) मुंबईत दिवसभरात ३५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत दररोज ५०० हून कमी रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या डिसेंबरच्या सुरुवातीला शहरात २००-२५० रुग्ण सापडत होते. मात्र २१ डिसेंबरनंतर हा आकडा २० हजारांच्या घरात गेला. त्यानंतर पालिकेनं निर्बंध लागू केले. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बरेचसे निर्बंध हटवण्यात आले.