Join us

“शिवसेना घाबरुन घरात बसणार नाही”; यशवंत जाधवप्रकरणी किशोरी पेडणेकरांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 2:53 PM

लंकेला आग लावावी तसे हे सगळे बोंबलत चालले आहेत, अशी टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

मुंबई: मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाने छापा घातला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने हा छापा टाकल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. यशवंत जाधव या धाडीला हवी ती उत्तरे देतील, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. 

प्राप्तिकर विभागाचा छापा पहिल्यांदा पडत आहे, अशातला भाग नाही. या सगळ्या संस्थ्या संविधानाला मानून काम करत आहेत. त्यांना जी माहिती हवी आहे ती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे नक्की देतील. शिवसैनिकांनी अनुचित प्रकार करू नये म्हणून या ठिकाणी आले, असे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले. 

उगाचच वातावरण बिघडू नका

तुम्ही ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर करत आहात ते मुंबई आणि महाराष्ट्र बघत आहे. जिथे भाजापची सत्ता नाही तिथे हा त्रास होत आहे. हा त्रास होत आहे म्हणून आम्ही घरात घाबरुन बसणार नाही. जे आहे ते तुम्हाला दाखवू. हे सर्व दुधाने धुतलेले आहेत आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एवढेच बरबटलेले आहेत हे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही कायदा मानतो आणि त्यानुसार ही पाहणी आहे. यशवंत जाधव याला उत्तर देतील. त्यामुळे उगाचच वातावरण बिघडू नका, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सगळे स्पष्ट होऊन आपल्या समोर येणार आहे. त्याआधीच लंकेला आग लावावी तसे हे सगळे बोंबलत चालले आहेत. या यंत्रणा दोन्ही बाजूने वापरता येतात. निवडणुकीच्या तोंडावर आणि सत्ता गेल्यापासून बुडाला आग लागली आहे, हे महाराष्ट्र आणि मुंबई बघत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कुठलाही अनुचित प्रकार करु नका. आधी शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळांनाही चिवटपणे लढा दिला. त्यांना दोन वर्षे मनस्ताप भोगावा लागला. पण नंतर त्याच न्यायालयाने त्यांना क्लीन चीट दिली, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर केली. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकिशोरी पेडणेकरभाजपाशिवसेना