मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. "माझ्या मोबाईलवरुन एका कार्यकर्त्यानं ते ट्वीट केलं होतं. तो शिवसैनिकाचा राग होता, मात्र ते चुकीचंच होतं. त्याची मी हकालपट्टी केली आहे", अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली आहे.
किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांच्या १ कोटी लसींसाठी ९ कंपन्या समोर आल्याची माहिती दिली होती. यासंदर्भातील ट्विटवर एका नेटिझननं हे कॉन्ट्रॅक्ट नेमकं कुणाला दिलं? असा सवाल केला होता. त्यावर किशोरी पेडणेकर यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं होतं. किशोरी पेडणेकरांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आणि महापौरांवर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर आज किशोरी पेडणेकर यांनी घडलेल्या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
“ट्विटरवर जे काही लिहिलं ते मी लिहिलं नव्हतं. माझ्या कार्यकर्त्याच्या हातात मोबाईल होता. वांद्रे बीकेसीमध्ये कार्यक्रम सुरु होता, तेव्हा त्याच्या हातात मी माझा मोबाईल दिला होता. त्या कार्यकर्त्याला मी समज दिली आहे. ते ट्वीट मी त्वरित डिलीट केलं आहे. शिवसैनिक कार्यकर्त्यानं तो राग व्यक्त केला, पण ते चुकीचं होतं. या प्रकरणातून आता मला एक प्रकारचा धडा मिळाला आहे. यापुढील काळात याबाबत मी काळजी बाळगेन", असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.