मुसळधार पावसानं मुंबईची तुंबई; गुडघाभर पाण्यातून महापौरांकडून परिस्थितीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 09:15 PM2020-08-04T21:15:00+5:302020-08-04T21:16:08+5:30
किशोरी पेडणेकर यांच्याकडून विविध भागांची पाहणी; अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई: काल रात्रीपासून जोर धरलेल्या पावसानं आजही मुंबईला झोडपून काढलं. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचलं. कित्येक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनी अनेक भागांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली. दादर हिंदमाता येथे गुडघाभर पाण्यात उभं राहून महापौरांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तात्काळ पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं. काही भागांत घरांमध्ये पाणी शिरलं. त्याची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळीच अधिकऱ्यांना बोलावून मुंबईतील विविध भागांची पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली. पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवलीत दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. या भागाचीदेखील महापौरांनी पाहणी केली.
दादरमधल्या हिंदमाता परिसरात गुडघाभर पाण्यात उभं राहून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. बीकेसीतल्या मिनी पंपिंग स्टेशनला भेट देऊन किशोरी पेडणेकर यांनी पाणी उपसा करणाऱ्या पंपाची पाहणी केली. कलानगर तसेच इंदिरानगर या परिसरात भरणाऱ्या पाण्याचा उपसा या पंम्पिंग स्टेशनच्या माध्यमातून केला जातो. गतवर्षी या परिसरात भरलेल्या पाण्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी केली आहे.
मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस आहे. आजही पावसानं जोर कायम ठेवला. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबलं. पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आज मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. चहल यांनी अंधेरीच्या मिलन सबवे भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या भागात अतिरिक्त पंप लावून पाणी उपसण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले.