मुंबई – शहरातील रस्ते आणि त्यावरील खड्डे हे सामान्य मुंबईकरांच्या जीवनातलं समीकरण बनलं आहे. दरवर्षी मुंबईच्या रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतात. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कोट्यवधीची कंत्राटे काढली जातात. यात कंत्राटाच्या माध्यमातून सत्ताधारी झोल करत असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमी केला जातो.
मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विरोधकांना सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची आयती संधीच मिळते. त्यातच आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(BMC Mayor Kishori Pednekar) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महापौर किशोरी पेडणेकर खड्ड्यावरुन पालिका सहाय्यक आयुक्तांना झापत असल्याचं दिसून येतं. हा व्हिडीओ कुर्ला येथील जरीमरी भागातील असल्याचं सांगितलं जातं. या व्हिडीओत महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार दिलीप लांडेही दिसून येतात.
या व्हिडीओत किशोरी पेडणेकर म्हणतात की, काय चाललंय, तुम्हाला कळत नाही. काय दिसतंय तुम्हाला? आपण आयुक्त आहात? आयुक्ताचं काम करता? ही फाईल फेकून देऊ का? असं महापालिका अधिकाऱ्यांना फटकारत रस्त्यावरील खड्ड्यांकडे बोट दाखवतात. नेमका हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओचा वापर करत भाजपा आणि मनसेने महापौरांची खिल्ली उडवली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर(BJP Atul Bhatkhalkar) यांनी म्हटलंय की, मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे पाहून महापौर किशोरी पेडणेकर यांना बसलेला धक्का आणि त्यातून उसळलेला सात्विक संताप पाहा. Grinning face बहुधा आयुष्यात प्रथमच त्यांनी खड्डे पाहिले आहेत. किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तर मनसेचे स्थानिक नेते गणेश चुक्कल यांनी मुंबईच्या रस्त्यावर बिनपैशाचा तमाशा सुरू आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे दरवर्षी मुंबईकर जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात. वारंवार कोट्यवधीचे टेंडर काढले जातात. त्यातून वसुली जोरात होते. सत्ताधारी निगरगट्ट बनतात. परंतु मुंबईच्या महापौरांना कदाचित पहिल्यांदाच हे खड्डे दिसले असावेत. त्यामुळे मी मारल्यासारखं करते अन् तू रडल्यासारखं कर असाच डाव शहरातील रस्त्यावर मुंबईकरांना मोफत पाहायला मिळत आहे. निवडणूक जवळ आल्यानं अशा नौटंकी पाहायला मिळणार पण जनता तुमच्या खोट्या नाटकाला नाही भूलणार अशा शब्दात त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.