मुंबई - मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नसल्याने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी विभागाच्या बाहेर आहेत. तर खार येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मुंबई आणि राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार केले जात होते. रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेने आपल्या इतरही रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यास सुरुवात केली आहे.पालिकेने खासगी रुग्णालयेही ताब्यात घेतली असून त्यामध्येही उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, पालिकेच्या रुग्णालयात सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांची आहे.कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला आहे. आधी सेफ्टी किट द्या, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.तर खार येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात रविवारपासून कोरोनावर उपचार केले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्हकांदिवली शताब्दी रुग्णालयातील ६० जणांना क्वारंटाइन कऱण्यात आले होते. त्यात ४० परिचारिका व अन्य २० जणांत डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या सर्वांच्या कोरोना चाचण्या कऱण्यात आल्या होत्या. त्यांचा अहवाल शनिवारी निगेटिव्ह आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
CoronaVirus: सुरक्षा किट्स नसल्याने मुंबईतील आरोग्य कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 9:01 PM