तिन्ही मार्गांवरील मेगाब्लॉकमुळे मुंबईसह उपनगरातील लोकलप्रवाशांचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 09:22 AM2018-06-17T09:22:38+5:302018-06-17T09:23:03+5:30
दिवा स्थानकात पुलाचे गर्डर टाकण्यासाठी घेण्यात आलेला ट्रॅफिक ब्लॉक आणि मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी नियोजित असलेल्या ब्लॉकमुळे रविवारी दिवसभर प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
मुंबई - दिवा स्थानकात पुलाचे गर्डर टाकण्यासाठी घेण्यात आलेला ट्रॅफिक ब्लॉक आणि मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी नियोजित असलेल्या ब्लॉकमुळे रविवारी दिवसभर प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. दिवा स्थानकातील कामासाठी मध्यरात्रीपासूनच ब्लॉक घेण्यात आल्याने पहाटेपासूनच लोकलच्या वाहतुकीची गती मंदावली होती. तर परळ स्थानकातही तसेच परळ स्थानकातील नव्या फलाटासाठी ८ तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी दिवसभर उशिराने होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय हार्बर मार्गावरील लोकल वाहतूकही रविवारी ६ तास बंद राहणार आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावरही जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे रविवारी प्रवाशांचे ‘मेगाहाल’ होणार आहेत.
दिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री १२ वाजून ४५ मिनिटे ते ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत सहा तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला. यामुळे कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. तसेच विविध मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या. या ब्लॉकमुळे रविवारी पहाटेपासूनचन मध्य रेल्वेची वाहतून मंदावली होत. तसेच मुंबईकडे येणाऱ्या लोकल 30 ते 35 मिनिटे उशिराने धावत आहे.
परळ स्थानकात नव्या फलाटांकरिता रुळांच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटे ते ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत आठ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात धिम्या मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर व माटुंगा स्थानकानंतर पुन्हा धिम्या मार्गावर वळविण्यात येईल. ब्लॉक काळात सर्व लोकल फेऱ्या नेहमीच्या थांब्यासह अन्य स्थानकांवरही थांबतील. यामुळे लोकल फेºया सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.
याशिवाय रविवारी हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान ११ वाजून ३४ मिनिटे ते दुपारी ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत एकही लोकल धावणार नाही. चुनाभट्टी /वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील वाहतूक ११ वाजून १० मिनिटे ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत बंद असेल. प्रवाशांच्या सोईसाठी पनवेल, कुर्ला येथून विशेष लोकल सोडण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बर तिकीट, पासवर पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत अप आणि डाउन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घोषित केला आहे. या काळात धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येईल. तर, काही लोकल फेºया रद्द करण्यात येणार आहेत.