मुंबई गारठली ! पारा पुन्हा १४ अंशांवर; दोन दिवस गारवा राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 05:54 AM2019-02-18T05:54:25+5:302019-02-18T05:54:45+5:30

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत होती.

Mumbai! Mercury is again 14 degrees; For two days the garrison will remain | मुंबई गारठली ! पारा पुन्हा १४ अंशांवर; दोन दिवस गारवा राहणार

मुंबई गारठली ! पारा पुन्हा १४ अंशांवर; दोन दिवस गारवा राहणार

Next

मुंबई : मुंबईचे किमान तापमान रविवारी १४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १०.२ अंश नोंदविण्यात आले आहे. कमाल आणि किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे वातावरणात पुन्हा एकदा गारवा वाढला असून, असेच वातावरण सोमवारसह मंगळवारी कायम राहील.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत होती. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. मात्र, वातावरणातील बदलामुळे मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान २९ तर किमान तापमान १४ अंश नोंदविण्यात आले आहे. कमाल आणि किमान तापमानातील घसरणीमुळे सकाळसह सायंकाळ आणि रात्रीच्या हवेतील गारवा वाढला असून, सोमवारसह मंगळवारी असेच वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत व कोकण, गोव्याच्या उर्वरित भागांत किमान तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

पावसाचा इशारा
१८ आणि १९ फेब्रुवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातृ तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारसह मंगळवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल ३१ आणि किमान १६ अंशाच्या आसपास तापमान राहील.

महिनाभर थंडी हुलकावणी देणार
वातावरणात सतत होत असलेले बदल, उत्तर भारतात सुरू असलेली हिमवृष्टी यामुळे सध्या सतत हुलकावणी देणारी थंडीची स्थिती अजून महिनाभर तरी कायम राहील, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. आपल्याकडे होळीपर्यंत थंडी असते असे मानण्याचा प्रघात आहे. होलिकोत्सव झाला, की थंडी परतली असे गृहीत घरले जाते. तो अंदाजही मान्य केला, तर साधारण महिनाभर तरी तापमानात सतत चढ-उतार होत राहतील, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. हवामान खात्याने अद्याप याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. मात्र गेल्या आठवड्यात विदर्भात काही भागात गारांचा पाऊस पडला. अमेरिकेसह वेगवेगळ््या देशांतील हवामानातही वेगाने चढ-उतार झाले. परिणामी, माघारी निघालेली थंडी पुन्हा परतली आणि किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले.

Web Title: Mumbai! Mercury is again 14 degrees; For two days the garrison will remain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.