मुंबईचा पारा ३२ अंशांवर; उन्हाळा आणखी ‘ताप’दायक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 04:06 AM2019-05-13T04:06:54+5:302019-05-13T04:07:10+5:30

मे महिन्याच्या मध्यात उन्हाळा आणखी ‘ताप’दायक झाला असून, वाढत्या उन्हाळ्याने विदर्भाला घाम फोडला आहे.

 Mumbai mercury hits 32 degrees mark; Summer is another 'heat-sensitive' | मुंबईचा पारा ३२ अंशांवर; उन्हाळा आणखी ‘ताप’दायक

मुंबईचा पारा ३२ अंशांवर; उन्हाळा आणखी ‘ताप’दायक

googlenewsNext

मुंबई : मे महिन्याच्या मध्यात उन्हाळा आणखी ‘ताप’दायक झाला असून, वाढत्या उन्हाळ्याने विदर्भाला घाम फोडला आहे. येथे सातत्याने उष्णतेची लाट नोंदविण्यात येत असून, आता १२ ते १६ मे दरम्यान विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर मुंबईचे कमाल तापमान रविवारी ३२ अंश नोंदविण्यात आले असून, मुंबईकर घामाने हैराण झाले आहेत. सोमवारसह मंगळवारी मुंबईसह परिसरात सायंकाळी ढगाळ वातावरण नोंदविण्यात येईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. १३ ते १६ मे या कालावधीत विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल. मुंबई आणि आसपासच्या परिसराचा विचार करता, १३ आणि १४ मे रोजी आकाश मुख्यत: निरभ्र राहील. सायंकाळसह रात्री आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २४ अंशाच्या आसपास राहील.
मुंबई आणि आसपासच्या परिसराचा विचार करता, गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश नोंदविण्यात येत होते. रविवारी मुंबईच्या कमाल तापमानात एका अंशाची घसरण झाली आहे. तापमानात एका अंशाची घसरण नोंदविण्यात येत असली, तरी उन्हाचा पारा चढाच आहे. ‘ताप’दायक ऊन मुंबईकरांना घाम फोडत असून, येत्या २४ तासांसाठी असेच वातावरण कायम राहील.

असह्य उन्हाचा त्रास!
गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना असह्य उकाड्यास सामोरे जावे लागत आहे. विशेषत: आर्द्रतेमध्ये वाढ नोंदविण्यात येत असून, यात उष्ण आणि कोरडे वारे भर घालत आहेत. उष्ण आणि कोरडे वारे मुंबईकरांच्या घशाला कोरड पाडत आहेत, तर उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. विशेषत: कमाल तापमान ३३ अंशावर स्थिर असतानाही ‘ताप’दायक वातावरण मुंबईकरांच्या त्रासात भर घालत आहे. रविवारी कमाल तापमानात एका अंशाची घसरण झाली असली, तरीदेखील दिवसभर पडलेल्या उन्हाने मुंबईकरांना चटकेच दिले आहेत.

Web Title:  Mumbai mercury hits 32 degrees mark; Summer is another 'heat-sensitive'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.