मुंबई - आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्यानंतर संध्याकाळपासून आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली. संध्याकाळी इलेक्ट्रिक कटरच्या आणि करवतींच्या सहाय्याने झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर मोठा आवाज निर्माण झाल्याने स्थानिकांना घटनस्थळी धाव घेतली. तसेच ही माहिती वेगाने पसरल्याने पर्यावरणप्रेमींनी आरेमध्ये धाव घेत वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोपही पर्यावरणप्रेमींनी केला. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मेट्रो प्रशासनाने तातडीने वृक्षतोड करण्यास सुरुवात केल्याने पर्यावरणप्रेमींचा संताप अनावर झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने गोरेगाव येथील आरे मेट्रो कारशेडविरोधात दाखल याचिका शुक्रवारी फेटाळल्या. त्यानंतर रात्री मेट्रो कारशेडसाठी येथे वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आली. याची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला. वृक्षतोडीला विरोध दर्शवत येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत निषेध केली. रात्री उशिरापर्यंत वृक्षतोडीच्या विरोधासाठी पर्यावरणप्रेमींची गर्दी वाढतच गेली. अखेर पोलिसांनी यातील काही पर्यावरणप्रेमींना ताब्यात घेतले. दरम्यान, येथे दोनशेहून अधिक झाडे तोडण्यात आल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.आरेत वृक्षतोड होत असल्याचे समजताच भांडुप, पवई, अंधेरी, गोरेगाव येथील पर्यावरणप्रेमींसह सामाजिक संस्था, विविध ग्रुप, स्थानिकांनी येथे गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दाखल झाले. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. वृक्ष तोडीस विरोध करण्यासाठी दाखल पर्यावरण प्रेमीना प्रकल्प स्थळी जाण्यास पोलीस प्रशासनाने मज्जाव केला. येथील गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला जात असतानाच पर्यावरणप्रेमी आणि पोलीसांमध्ये धक्काबुकी झाली. यावेळी पर्यावरण प्रेमींनी महापालिका, मेट्रो प्रशासन यांच्या विरोधात घोषणा दिल्या असून, तीनशे झाडे तोडल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे न्याय मिळत नाही तोवर घटनास्थळाहून बाहेर पडणार नाही, असा निर्धार पर्यावरण प्रेमींनी यावेळी केला.येथील वृक्षतोडीला विरोध म्हणून गेले काही रविवार पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतरही हा विरोध कायमच असल्याचे चित्र शुक्रवारी रात्री पुन्हा पाहायला मिळाले. दरम्यान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे याप्रकरणी ट्विट करून झाडे तोडण्याच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.