मुंबई मेट्रो-३ च्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे आदेश, कारण काय? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 02:20 PM2023-11-09T14:20:37+5:302023-11-09T14:22:09+5:30

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी जारी करण्यात आलेली नियमावली न पाळणाऱ्या कंत्राटदारांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि मनपानं दणका दिला आहे.

Mumbai Metro 3 contractor ordered to stop work notice for non compliance of pollution prevention rules | मुंबई मेट्रो-३ च्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे आदेश, कारण काय? वाचा...

मुंबई मेट्रो-३ च्या कंत्राटदाराला काम थांबवण्याचे आदेश, कारण काय? वाचा...

मुंबई-

मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी जारी करण्यात आलेली नियमावली न पाळणाऱ्या कंत्राटदारांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि मनपानं दणका दिला आहे. शहरातील कोस्टल रोड आणि मेट्रो प्रकल्पांशी संबंधित विविध पायाभूत सुविधांची कामं करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस बजावल्या आहेत. मनपाने जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला काम थांबवण्याची नोटीसा बजावली आहे, तर प्रदूषण नियंत्रण महामंडळानं १४ रेडी मिक्स काँक्रिट प्लांट्सना (RMC) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात लार्सन अँड टुब्रो लिमिटेडद्वारे चालवल्या जाणार्‍या चार प्लांट्सचाही समावेश आहे. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नोटीस मिळालेल्या इतर RMC प्लांट्समध्ये अविघ्न कॉन्ट्रॅक्टर्स, सेंच्युरी इस्टेट्स, स्वयं रिअल्टर्स अँड ट्रेडर्स, नागार्जुना कंस्ट्रक्शन कंपनी, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्टर्स, अॅप्को इन्फ्राटेक आणि आयटीडी सिमेन्टेंशन इंडिया लिमिटेड यांच्या मालकीच्या युनिट्सचा समावेश आहे. 

जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला मनपाने काम थांबवण्याची नोटीस दिल्याची पुष्टी सहाय्यक महापालिका आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांनी केली आहे. “आम्ही बीकेसी परिसरात पायाभूत सुविधांची कामे करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना धूळ कमी करण्याच्या उपायांचे पालन करण्यास सांगितले होते. तरीही उपाय-योजनांचा कंत्राटदाराने (जे कुमार इन्फ्रा) पाठपुरावा केला नसल्याने त्यांना ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात आली”, असं क्षीरसागर यांनी सांगितलं. 

जे कुमार इन्फ्रा कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो कॉरिडॉरचे बांधकाम करत आहे आणि या प्रकल्पाचा टर्मिनल विभाग BKC मधील आयकर कार्यालय (ITO) जंक्शनवर आहे.

“आम्ही बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या संबंधितांना सूचना पत्र जारी केलं आहे आणि त्यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. त्यांनी आश्वासन दिले आहे की ते पुढील २ ते ३ दिवसांत उपाययोजनांचं पालन करतील”, असंही क्षीरसागर यांनी सांगितलं. गेल्या एका आठवड्यात, एकट्या बीकेसीमध्ये कार्यरत असलेल्या ९ कंत्राटदारांना काम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) या आठवड्याच्या सुरुवातीला नागरी प्राधिकरणाच्या प्रदूषण कमी करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमधून सूट मागितली असतानाही बीएमसीनं कारवाई केली आहे. BKC हा शहरातील वायू प्रदूषणामुळे सर्वात प्रभावित पॉकेट्सपैकी एक म्हणून उदयास आला आहे. ज्याने सातत्याने खराब AQI नोंदवला आहे.

Web Title: Mumbai Metro 3 contractor ordered to stop work notice for non compliance of pollution prevention rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.