Join us

'पर्यावरणाचा ऱ्हासाचा कांगावा, आता सर्व राजकीय प्रदूषण बाद', CM शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:06 PM

आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो-३ ची ट्रायल रन अखेर आज आरेतील सारीपूतनगर येथे पार पडली.

मुंबई-

आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो-३ ची ट्रायल रन अखेर आज आरेतील सारीपूतनगर येथे पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो-३ च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

"उद्या विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन होत आहे. पण बाप्पा येण्याआधीच मुंबईकरांसमोरील मोठं विघ्न आज दूर झालं आहे. आता मेट्रो-३ च्या कामात कोणतंही विघ्न येणार नाही. सर्वसामान्य जनतेचा फायदा लक्षात घेऊन इन्फ्रास्ट्रक्चरबाबत सकारात्मक निर्णय घेणारं हे सरकार आहे. मेट्रो-३ ही मुंबईकरांची नवी लाइफलाइन ठरणार आहे. त्यामुळे जनतेच्या फायद्याचा निर्णय घेणारं सरकार आलं आहे. या मेट्रोमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा कांगावा केला गेला. पण आता सर्व राजकीय प्रदूषण बाद झालं आहे", असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला. 

पर्यावरण रक्षणाची सर्वांचीच जबाबदारी पण..."पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच जबाबदारी आहे आणि याची सर्वांनाच काळजी आहे. काही विशिष्ट लोकांनाच याची काळजी आहे असं नाही. मी आता या ठिकाणी आलो तेव्हा पाहिलं याठिकाणी तिन्ही बाजूंनी रस्ते आहेत. ज्यापद्धतीनं पर्यावरणाच्या ऱ्हासाचा दावा केला गेला तसं काहीच झालेलं नाही आणि देशाचं सर्वोच्च न्यायालय देखील देशातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं निकाल देत असतं. मेट्रो-३ मुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. आज लोकल ट्रेनमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक त्रासून प्रवास करतात. तसंच गर्दीला कंटाळून लोकांनी स्वत:ची वाहनं घेण्याचा सपाटा लावला. पण आपल्याला राज्यातील सार्वजनिक वाहतूक भक्कम करायची आहे. जेणेकरुन लोकांना त्यांची वाहनं बाहेर काढावी लागणार नाहीत", असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पहिल्या ट्रेनच्या आठ डब्यांचे उच्च दाबाने चार्जिंग सुरू केले आहे. आता तात्पुरत्या सुविधेपासून मरोळ मेट्रो स्थानकापर्यंतच्या ३ किलोमीटर लांबीच्या ट्रॅकवर ट्रेनच्या चाचण्या महिन्याच्या केल्या जातील.
  • प्रत्येक ट्रेनचे चार्जिंग ही रोजची, कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे. २५ केव्ही - एसी इतक्या उच्च दाबाने ट्रेनचे डबे चार्ज केल्यानंतरच अनेक प्रणाली चाचण्या केल्या जाऊ शकतात. त्यामध्ये वातानुकूलित यंत्रे, संवाद प्रणालीमध्ये सामील असणारे भोंगे, विद्युत यंत्रणा इत्यादींचा समावेश आहे. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतरच ट्रेनच्या डीझाइन सिद्ध करणा-या पुढील चाचण्या घेण्यात येतात.

१) मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कुलाबा - वांद्रे - सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे.२) आता मरोळ येथे मेट्रोची चाचणीदेखील सुरु झाली आहे.३) प्रकल्पातील बीकेसी ते सीप्झ हा पहिला टप्पा जून २०२३ दरम्यान सुरु होणार आहे.४) सुरुवातीला या प्रकल्पाची किंमत २३ हजार कोटी रुपये होती.५) आता या प्रकल्पाचा खर्च ३३ हजार कोटींवर पोहचला आहे.६) प्रकल्पाचे काम ७५ टक्के झाले असले तरी कोरोनाचा मोठा फटका प्रकल्पाला बसला आहे.७) मुंबई मेट्रो मार्ग - ३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. ८) मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके आहेत.९) २०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील.१०) मार्गिका सुरु झाल्यानंतर नरिमन पॉईंट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्त्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ ५० मिनिटात करणे सहज शक्य होणार आहे.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेआदित्य ठाकरे