Join us

मुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रं, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांची मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 2:39 PM

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या २०१९ दिनदर्शिकेमध्ये काही आकर्षक चित्रे सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळणार आहेत.

मुंबई - मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या २०१९ दिनदर्शिकेमध्ये काही आकर्षक चित्रे सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळणार आहेत. आगामी वर्षाची दिनदर्शिका सर्वोत्तम असावी यासाठी एमएमआरसीने "मुंबई मेट्रो 3च्या कामकाजाचा आढावा दर्शवणारी चित्रे" या संकल्पनेअंतर्गत जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसह एमएमआरसीच्या मुख्य कार्यालयात 10 डिसेंबरला चित्रप्रदर्शनी आयोजित केली होती . मुंबई मेट्रो ३ च्या सर्व पॅकेजची एकूण २० चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी हजेरी लावली .

या उपक्रमात सहभागी झालेल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधील 10 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी हे चित्रकार तर एक विद्यार्थी शिल्पकार आहे. या विद्यार्थ्यांनी मुंबई मेट्रो ३ च्या कामाचा आढावा घेणारी चित्रे कॅनव्हासवर हुबेहूब मांडले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः मेट्रोच्या स्टेशनची पाहणीकरून त्यानंतर आपली कला कॅनव्हासवर उतरवल्यामुळे चित्रांमध्ये वास्तवात आली होती. एकूण १८ पैकी ६ चित्रांची निवड परीक्षक प्रभाकर कोलते, अभय सरदेसाई आणि अंजली गुप्ते यांनी केली. ही सर्वोत्तम ६ चित्रे २०१९ च्या मुंबई मेट्रो ३ दिनदर्शिकेमध्ये झळकणार आहेत.

या प्रदर्शनामध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे सुरज लोहार आणि आनंद प्रताप या दोन विद्यार्थ्यांची चित्रे सर्वोत्तम ठरली, त्याचप्रमाणे निलीशा फाड, अभिजित पाटोळे, अनिरुद्ध सूर्यवंशी प्रतीक राऊत या विद्यार्थ्यांची चित्रेदेखील प्रशंसनीय ठरली आहेत. या प्रसंगी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, " या विद्यार्थ्यांची कला आणि त्यातून व्यक्त होणारी अचुकता अविश्वसनीय आहे. त्यांनी मेट्रो 3 च्या कामाचा आढावा इतक्या सहजतेने घेतला आहे हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे."

टॅग्स :मेट्रोमुंबई