मुंबई मेट्रो : नऊ महिन्यानंतरही उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 05:14 PM2020-09-12T17:14:53+5:302020-09-12T17:17:37+5:30
ट्रेनिंगची वा जॉइनिंगची तारिख प्राप्त झालेली नाही
मुंबई : मुंबईमेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडने सप्टेंबर २०१९ मध्ये विविध तांत्रिक पदांकरिता १ हजार ५३ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या सर्व पदांची ऑनलाईन परिक्षा ही नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आली. या परिक्षेचा निकाल डिसेंबर महिन्यात लागला. निकाल लागल्यानंतर मुंबई मेट्रोने कागदपत्रे पडताळणीचे काम जानेवारी-फेब्रूवारी २०२० मध्ये हाती घेतले. जून महिन्यात अंतिम यादी जाहीर करण्यात आली. आणि केवळ स्टेशन कंट्रोलर पदाच्या ४१ उमेदवारांचे प्रशिक्षण हैदराबादमध्ये ६ मार्च २०२० पासून सुरु करण्यात आले. मात्र टेक्निशियन ग्रेड-२ च्या उमेदवारांना नोकरीबाबत अद्यापही ट्रेनिंगची वा जॉइनिंगची तारिख प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सदर उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २२ मार्च रोजी लॉकडाऊन लागू झाला. तेव्हापासून टेक्निशियन ग्रेड-२ च्या ट्रेनिंगची वा जॉइनिंगची तारिख मिळालेली नाही. निकाल लागल्यापासून ९ ते १० महिने झाले तरी मुंबई मेट्रोकडून जॉइनिंगच्या तारीखेबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. परिणामी यासाठी म्हणजे ग्रेड-२ च्या ताटकळत असलेल्या उमेदवारांनी मुंबई मेट्रोशी याबाबत संवाद साधला. आणि डिसेंबर २०२० पर्यंत जॉइनिंगची मागणी केली. त्यावेळी आम्हाला ज्याप्रमाणे गरज भासेल त्या प्रमाणे उमेदवारांना बोलावले जाईल, अशी माहिती मुंबई मेट्रोकडून उमेवारांना देण्यात आली. आता निवड झालेल्या टेक्निशियन ग्रेड-२ च्या उमेदवारांपैकी ६० ते ७० टक्के मुला मुलींनी त्यांची मागची नोकरी सोडली आहे. त्यामुळे त्यांचा इन्कम सोर्स बंद आहे. अशावेळी त्यांची या नोकरीवर आशा असून, आम्हा सर्व टेक्निशियन ग्रेड-२ च्या उमेदवारांना डिसेंबर २०२० पर्यंत जॉइंनिंग द्या; अशी मागणी सदर उमेदवारांनी केली आहे. दरम्यान, सुत्रांच्या म्हणण्यानुसार या उमेदवारांचा आकडा ४०० ते ५०० आहे.