मुंबई : नव्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा आरेमध्येचे भुयारी मेट्रो तीनच्या कारशडेचा घाट घातला असतानाच दुसरीकडे या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांकडून जोरदार विरोध होऊ लागला आहे. रविवारी या विरोधात आरेमधील पिकनिक पॉइंट परिसरात उतरलेल्या आंदोलकांना माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे पाठबळ मिळाले होते. आदित्य यांनी यावेळी मुंबईची जैवविविधता नष्ट होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली असतानाच आंदोलकदेखील मेट्रोचे कारशेड आरेमध्ये नाही तर कांजूरमार्ग येथे झाले पाहिजे, या मतावर ठाम राहिले.
रविवारी सकाळी पुन्हा एकदा पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते आरेमधील भुयारी मेट्रोच्या कारशेडला विरोध करण्यासाठी एकत्र आले होते. गेल्या रविवारीदेखीलच याच प्रकारे आरेमध्ये कारशेडला विरोध करण्यात आला होता. मात्र नवे सत्ताधारी आरेवर ठाम असल्याने त्याला विरोध दर्शविण्यासह आम्हीही कांजूरवर ठाम असल्याचे सांगण्यासाठी पुन्हा आरेत एकत्र आले होते. आषाढी एकादशीचे औचित्य साधत काही आंदोलक वारीकरी वेषात दाखल झाले होते. तर चिमुकली विठठलाच्या वेशभूषेत दाखल झाली होती. त्यांनीदेखील आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध दर्शविला.
पर्यावरणाची होईल हानीकेवळ विरोध नाही तर येथे कारशेड झाल्याने पर्यावरणाची कशी हानी होईल? याचे दाखले चित्रांच्या माध्यमांतून दिले. केवळ पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते नव्हे तर आजच्या आंदोलनात शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्तेदेखील मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभागी झाले होते. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करतानाच आम्हीही पुन्हा आलो आहोत आणि आमचा आरेमधील मेट्रो कारशेडला विरोधच राहील. कारण येथे कारशेड बांधले तर झाडे तोडली जातील. पर्यावरणाचे नुकसान होईल. त्यामुळे कांजूरमार्गला कारशेड बांधण्यात यावे; या आमच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले.