Mumbai Metro Car Shed Row: मेट्रो कारशेड बनतेय राजकीय आखाडा,
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 02:05 AM2020-11-04T02:05:22+5:302020-11-04T06:33:15+5:30
Mumbai Metro Car Shed Row: मेट्रो कारशेडच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या या कुरघोडीच्या राजकारणाचा फटका मात्र सामान्य मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे.
मुंबई : मेट्रो ३ चे कारशेड आरेऎवजी कांजुरमार्ग येथे उभारण्याची घोषणा करत शिवसेनेने निवडणुकीपूर्व वायदा पूर्ण केला. तर, केंद्र सरकारने कांजुरच्या जागेवर आपला हक्क सांगत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मेट्रो कारशेडच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या या कुरघोडीच्या राजकारणाचा फटका मात्र सामान्य मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे.
आरेतील मेट्रोशेड रद्द करत कांजुर येथील भूखंडावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. परीक्षणासाठी माती घेण्यात आली. स्वतः मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक पाहणी दौराही केला. मात्र, या कामासाठी आवश्यक प्रशासकीय बाबींची पूर्तता केली नसल्याच्या आरोपावर महाविकास आघाडी सरकारकडून खुलासा करण्यात आला नाही. तर, दुसरीकडे केंद्राने इतक्या वर्षांनंतर आता जागा मिठागराची असल्याचे सांगत त्यावर आपला दावा सांगितला. शिवाय, एका दिवसात कांजुरच्या भूखंडावर आपले फलकही लावून टाकले. ही तत्परता याआधी का नाही, याचे उत्तर केंद्रातील सत्ता चालविणाऱ्या भाजपकडे नाही. विशेष, म्हणजे सत्ताधारी शिवसेनेसह महाविकास आघाडी आणि विरोधातील भाजपकडून आपापल्या भूमिकेला सोयीची माहिती, कागदपत्रे सादर केली जात आहेत. त्यामुळे कोण खरे, कोण खोटे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व गोंधळात ज्यांच्याकडे मेट्रोचे काम आहे त्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अद्याप कोणताच खुलासा केला नाही. शिवसेनेने आरेतील मेट्रोचे कारशेड रद्द करत, निवडणुकीपूर्वीचा वायदा पूर्ण केला. शिवाय, आपण पर्यावरणप्रेमींच्या बाजूने असल्याचेही ठासून सांगितले. परंतु, कारशेडसाठी आरेतील झाडे आधीच कापून झाली होती, काँक्रीटचे बांधकामही सुरू झाले होते. मग, झाडे कापलेली, कामही सुरू झालेले, मग कांजुरचा हट्ट का, याचे उत्तर शिवसेनेला देता आले नाही.
शिवाय, या जागेवरून न्यायालयात वाद असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच कागदपत्रांसह केला होता. त्यावरही सत्ताधाऱ्यांकडून ठोस उत्तर आले नाही. याउलट सत्ताधाऱ्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे भाजपकडून आली नाहीत. १९८१च्या आधीपासून या जागेपुढे राज्याचे नाव होते, २०१५ साली विभागीय आयुक्तांनी मिठागर जमीन मानल्याचाही कोणताच पुरावा नाही. शिवाय, तत्कालीन महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. यावर, भाजपनेही उत्तर दिले नाही.
- कारशेडच्या राजकीय वादात दोन्ही बाजूने आपलीच भूमिका पुढे रेटली जात आहे. त्यात प्रकल्प रखडणार का, याची धास्ती मुंबईकरांना आहे. मेट्रोच्या कामासाठी अनेक रस्त्यांवर पत्रे मारले गेले, रस्ता निम्मा झाला. पण, हीच मेट्रो भविष्यात वाहतूक कोंडी फोडेल, या आशेवर सध्या मुंबईकर पत्रे मारलेल्या रस्त्यांवरचा प्रवास सहन करताहेत. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय साठमारीत अजून किती वर्षे मेट्रोचे पत्रेच बघायचे, या प्रश्नाने मुंबईकरांच्या पोटात गोळा नक्कीच आला असेल.
महसुली नोंदीनुसार कांजुरमार्गची जागा ही पूर्वीपासून राज्य सरकारचीच आहे. ही जागा कारशेडसाठी एमएमआरडीएला देताना मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक सर्व दस्तावेजांची पडताळणी केलेली आहे. शिवाय, यावरील सर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांचीही पडताळणी करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही जागा एमएमआरडीएला देण्यात आल्याने कारशेडचे काम ठरल्याप्रमाणे सुरूच राहील.
- आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री