Join us

मुंबई मेट्रोचे भाडे ११0 रुपयांपर्यंत पोहोचणार!

By admin | Published: July 11, 2015 2:59 AM

वर्सोवा-अंंधेरी-घाटकोपर या मेट्रो १ मार्गावरून एसी डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच घाम फुटणार आहे. मेट्रोचे तिकीट कमाल ११0 रुपयांपर्यंत वाढविण्यास

मुंबई : वर्सोवा-अंंधेरी-घाटकोपर या मेट्रो १ मार्गावरून एसी डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच घाम फुटणार आहे. मेट्रोचे तिकीट कमाल ११0 रुपयांपर्यंत वाढविण्यास दरनिश्चिती समितीने हिरवा कंदील दर्शविला आहे. मेट्रोचे तिकीटदर वाढल्यास एमएमआरडीए त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.मेट्रोच्या तिकिटाचे दर वाढविण्यावरून रिलायन्स इन्फ्रा आणि एमएमआरडीएमध्ये वाद झाला होता. अखेर एमएमआरडीएने मुंबई उच्च न्यायालयात दरवाढीविरोधात आव्हान दिले होते. परंतु न्यायालयाने एमएमआरडीएची याचिका फेटाळून लावल्याने रिलायन्सने गतवर्षी जुलैमध्ये तिकिटाचे दर वाढविले. सध्या मेट्रोचे किमान तिकीट १0 रुपये आणि कमाल तिकीट ४0 रुपये आहे. रिलायन्सने पुन्हा तिकीट दरवाढीचा प्रयत्न केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दरनिश्चिती समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार केंद्राने मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ई. पद्मनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल मुंबई मेट्रो वन प्रा. लि. (एमएमओपीएल)कडे सादर केला आहे. या समितीने किमान १0 ते कमाल ११0 रुपयांपर्यंत भाडेवाढीस हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांचा खिसा कापला जाणार आहे.-----------दरनिश्चिती समितीचा अहवाल प्राप्त झाला असून, समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाईल. त्याचप्रमाणे प्रकल्पावर झालेला खर्च, रिअल इस्टेट क्षेत्रातील चढ-उतार, सरकारकडून मिळणारे अनुदान यांचा मेळ घालून भाडेवाढ केली जाईल. तसेच आमच्या प्रवाशांवर एकदम भार पडणार नसल्याचेही एमएमओपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले.मुंबई मेट्रो वन प्रा. लि. कंपनीस अजून भाडे वाढविण्याची संधी मिळाली आहे. याबाबत मेट्रो अ‍ॅक्टमध्ये बदल केल्याशिवाय गत्यंतर नसून, केंद्र सरकारने मुंबईकरांना दिलासा देण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.