मुंबई : कॅशलेस व कॉन्टॅक्टलेस व्यवहाराला चालना मिळावी यासाठी मुंबई-मेट्रोच्या वतीने मुंबईकरांसाठी वन मुंबई स्मार्ट कार्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे. या स्मार्ट कार्डच्या मदतीने मुंबईकरांना मेट्रो प्रवास तर करता येणार आहेच, पण त्यासोबतच दैनंदिन जीवनात व्यावहारिक कामांसाठीदेखील त्याचा उपयोग करता येणार आहे.
सोमवारपासूनच या स्मार्ट कार्डच्या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला.
कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग राहावे यासाठी ऑनलाइन, कॉन्टॅक्टलेस व कॅशलेस कामांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानुसारच हे स्मार्ट कार्ड डिझाइन केले आहे. यासाठी मेट्रो स्थानकांवर आवश्यक एएफसी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. हे स्मार्ट कार्ड मुंबईकरांना किराणा सामान, इंधन, रेस्टॉरंट, युटिलिटी बिल्स अशा रोजच्या खरेदीच्या कामांसाठीदेखील वापरता येणार आहे. क्लासिक आणि प्लॅटिनम रूपांमध्ये हे कार्ड उपलब्ध असणार आहे.
कार्ड व्हेरिएंटच्या आधारावर यामध्ये वापरकर्त्याला अनेक ऑफरसह पॉवर पॅकदेखील उपलब्ध आहे. यामध्ये आंतरदेशीय विमानतळ लाउंज प्रवेश, अपघात विमा, रेस्टॉरंट ऑफर, ब्रँड ऑफर यांचा समावेश आहे. हे कार्ड तिकीट काउंटरवर किंवा सर्व मेट्रो स्थानकांच्या कस्टमर केअर काउंटरवर खरेदी आणि रीचार्ज केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त त्यात ऑनलाइन रीचार्जदेखील केले जाऊ शकते. या प्रसंगी मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल शुभभोय मुखर्जी म्हणाले की, जागतिक दर्जाच्या सेवा देण्याच्या उद्देशाने वन मुंबई स्मार्ट कार्ड सुरू करण्यात आले. या कार्डमुळे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळेल अशी आशा आहे.