Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 11:26 AM2024-10-07T11:26:47+5:302024-10-07T11:31:10+5:30

Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या भूगर्भातून प्रवासाचे येथील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न आज, सोमवारपासून प्रत्यक्षात आले.

Mumbai Metro Line 3 first underground begins operations for public today | Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी

Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी

मुंबई :

मुंबईच्या भूगर्भातून प्रवासाचे येथील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न आज, सोमवारपासून प्रत्यक्षात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कुलाबा ते आरे (Mumbai Metro 3 ) या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर ही मार्गिका सर्वसामान्यांना आजपासून प्रवासासाठी खुली झाली. सकाळी ११ वाजता या मार्गावर पहिली गाडी सुटली.  

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहर आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आठ वर्षांपूर्वी मेट्रो ३ या भूमिगत मार्गिकेच्या कामाला प्रारंभ झाला. मुंबईकरांची या मेट्रोची प्रतीक्षा संपली आणि आजपासून आरे ते बीकेसीपर्यंत पहिल्या टप्प्यात या भुयारी मार्गातून प्रवासाला सुरुवात झाली. 

या मेट्रो मार्गिकेमुळे पश्चिम उपनगरातील प्रवास आणखी सुखकर होणार आहे. या नव्या मार्गिकेवरील मेट्रो गाड्या आरे जेव्हीएलआर स्थानकापासून सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, सीएसएमआयए टी-२, सहार रोड, सीएसएमआयए टी-१, सांताक्रुझ, बांद्रा कॉलनी या भागांतून पुढे बीकेसीपर्यंत धावणार आहेत. एमएमआरसीकडून ७ ऑक्टोबरला सोमवारी बीकेसी आणि आरे जेव्हीएलआर स्थानकातून सकाळी ११ पासून सेवा सुरू केली जाणार आहे. तर रात्री ८:३० वाजता शेवटची गाडी सुटेल. त्यानंतर ८ ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालविल्या जाणार आहेत.

मुंबईत ५९ किमी मेट्रोचे जाळे 
मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याच्या मार्गामुळे आता मुंबईकरांच्या सेवेत ५९ किमी अंतराचे मेट्रो जाळे दाखल झाले आहे. मुंबई महानगरात जवळपास ३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात असून, येत्या काही वर्षांत हे संपूर्ण जाळे तयार होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकणार आहे. 

८ ऑक्टोबरपासूनचे मेट्रोचे वेळापत्रक 
सोमवार ते शनिवार
- पहिली गाडी सकाळी ६:३० 
- शेवटची गाडी रात्री १०:३० 

रविवारी 
- पहिली मेट्रो सकाळी ८:३० 
- शेवटची गाडी रात्री १०:३० 

Web Title: Mumbai Metro Line 3 first underground begins operations for public today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.