मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रोंची कामे वेगाने झाली आहेत. या दोन्ही मार्गावरील मेट्रो चाचणी सोमवारी केली जाणार आहे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यातील सर्व कामे पूर्ण करून या दोन्ही मेट्रो येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रोच्या आकुर्ली स्थानकावर मेट्रोच्या चाचणी पूर्व कार्यक्रमात व्यक्त केला. या दोन्ही मार्गांवरील मेट्रोची सेवा सुरू झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना याचा फायदा होईल. २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वतुर्ळाकार मेट्रो मार्ग तयार होईल. २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अडथळ्यांवर मातसोमवारी दुपारी १२.३० वाजता मेट्रो रेल्वेची चाचणी होणार आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. आम्ही अनेक अडथळे पार करत हा टप्पा गाठला आहे. कोरोनासारखा मोठा अडथळा आहे. आजही आम्ही त्याच्याशी दोन हात करत आहोत. पण आता आम्ही चाचणीसाठी सज्ज झालो आहोत. - आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण