तीनच दिवसांत मेट्रो ३ विस्कळीत; ३०-३५ मिनिटे ट्रेन उशीराने, प्रवाशांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 03:13 PM2024-10-09T15:13:40+5:302024-10-09T15:15:44+5:30
दोनच दिवसात तांत्रिक अडचणींमुळे मेट्रो ३ ची सेवा विस्कळीत होत असल्याचे पाहून मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Mumbai Metro 3 : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते आरे दरम्यानच्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. सोमवार पासून हा मेट्रो मार्ग सर्वसामान्यांसाठी खुली झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केल्यानंतर सांताक्रूझ स्थानकापर्यंत मेट्रोचा प्रवासही केला होता. मात्र आता भुयारी मेट्रोबाबत प्रवाशांच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. दोनच दिवसात तांत्रिक अडचणींमुळे मेट्रो ३ विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मेट्रो ३ प्रकल्पातील आरे – बीकेसी भुयारी मेट्रो प्रवास सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. भुयारी मेट्रोतून प्रवास करण्यासाठी मुंबईकरांनी आरे – बीकेसी दरम्यानच्या स्थानकांवर गर्दी केली आहे. लवकर पोहोचण्यासाठी प्रवासी भुयारी मेट्रोतून प्रवास करत आहेत. मात्र आता लोकल सेवेप्रमाणेच मेट्रो सेवाही विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी आरे- बीकेसी स्थानकांदरम्यान मेट्रो उशीराने धावत होती.तब्बल अर्ध्या तास उशीराने मेट्रो बीकेसी स्थानकात पोहोचली. त्यानंतर बुधवारीही सकाळच्या सुमारास सहार स्थानकात मेट्रो अर्धातास खोळंबल्याने प्रवाशांनी गैरसोय झाली.
सलद दुसऱ्या दिवशी तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो लाइन ३ कॉरिडॉर सेवा प्रभावित झाली होती. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरील एका स्थानकावर ट्रेनचा दरवाजा बंद करण्याच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. मेट्रो प्रशासनाने या विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याशिवाय प्रवाशांना कोणतीही अन्य माहिती दिली नाही असे लोकांनी सांगितलं. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.३० च्या सुमारास सहार रोड स्थानकावरील दरवाजा बंद करण्याच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सेवा प्रभावित झाली होती.
सकाळच्या गर्दीच्या वेळी मेट्रो सेवा विस्कळीत झाल्याने ऑफिसला जाणाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला होता. ३०-३५ मिनिटे ट्रेन आली नसल्याचा दावा प्रवाशांनी केला होता. काही प्रवाशांनी मंगळवारीही ट्रेनला उशीर झाल्याची तक्रार केली. "गेल्या ३० मिनिटांपासून बीकेसी येथे कोणतीही ट्रेन नाही. कालही असेच घडले. ४५ मिनिटे वाट पाहिल्यानंतर ट्रेन आली. ती कधी पोहोचेल याबद्दल कोणताही माहिती नाही," असे एका युजरने सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं. दुसरीकडे, उद्घाटनानंतर दोनच दिवसांमध्ये मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.