मुंबई : घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मार्गावर धावणारी मुंबई मेट्रो आता आणखी वेगाने धावणार आहे. कारण अनलॉकनंतर मेट्रोच्या वेळेत आणखी बदल करण्यात आले असून, त्यानुसार आता सोमवारपासून मुंबई मेट्रो प्रवाशांना अधिक वेळेत घेऊन धावणार आहे.कोरोना काळात मेट्रोची सेवा सुरू झाल्यापासून मुंबई मेट्रो वनने आपल्या प्रवाशांच्या सुरक्षेची सातत्याने काळजी घेतली आहे. प्रत्येक स्टेशन सॅनिटाईज करण्यासह प्रत्येक गाडीमध्ये कोरोनाचे नियम पाळण्यावर भर दिला आहे. कोठेही नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. एक लाख प्रवाशांचे लसीकरण पूर्णसर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीकरण सुरू झाल्यापासून आजपर्यंत सुमारे पाचशेहून अधिक कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे, असा दावा मेट्रो प्रशासनाने केला आहे. आता तर दिवसागणिक लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांचा आकडादेखील वाढत आहे. आजघडीला हा आकडा एक लाख पन्नास हजार एवढा आहे.१८ ऑक्टोबरपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येत आहे. आता घाटकोपरहून पहिली मेट्रो सकाळी ६.३० वाजता धावेल. येथून शेवटची मेट्रो रात्री १०.५५ वाजता असेल. वर्सोवा येथून पहिली मेट्रो सकाळी ६.३० वाजता असेल. तर शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता असेल. गर्दीच्या वेळेला चार मिनिटांनी एक मेट्रो असेल, तर सर्वसाधारण वेळेत दहा मिनिटांनी एक मेट्रो असेल. दरम्यान, मेट्रोच्या प्रवासात सामाजिक अंतर पाळण्यासह कोरोनाचे नियम पाळण्याबाबत खबरदारी घेतली जात आहे.
मुंबईच्या मेट्रोचा वेग वाढणार, प्रवाशांना दिलासा; सोमवारपासून होणार बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 8:38 AM