मुंबई: एरवी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर तांत्रिक बिघाडामुळे होणाऱ्या खोळंब्याची सवय असलेल्या मुंबईकरांनी गुरूवारी मेट्रो रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचा अनुभव घेतला. घाटकोपरहून वर्सोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका मेट्रो ट्रेनचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांना वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्थानकावर उतरवण्यात आले.
परिणामी मेट्रोच्या वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. त्यामुळे सध्या अंधेरी आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या मेट्रोची वाहतूक सुरू असली तरी ट्रेन खूप विलंबाने धावत आहेत. मुंबई मेट्रो प्रशासनाशी याबाबत संपर्क साधला असता, तांत्रिक बिघाड झाल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याबाबत संबंधिताकडून माहिती घेऊन कळवतो, असे मेट्रो प्रवक्त्यांनी सांगितले.