मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ उभारण्यात आली असून, भविष्यात या दोन्ही मार्गांवर धावणा-या मेट्रोची चाचणी सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आकुर्ली मेट्रो स्थानकावर पार पडली.
मेट्रोच्या आकुर्ली स्थानकाला फुलांचा साज चढविण्यात आला होता. स्थानकाच्या फलाटावर चाचणीसाठीची मेट्रो मोठ्या दिमाखात उभी होती. पश्चिम द्रुतगती मार्गावर चाचणी होणाऱ्या मेट्रोला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्वच्छ आणि सुंदर अशा आकूर्ली मेट्रो स्थानकावर सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी साठीच्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला; आणि चाचणी करिता मेट्रो धावू लागली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यावेळी म्हणाले की, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ सुरु झाल्यानंतर अंधेरी ते दहिसर पट्टयातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. चालकविरहीत ट्रेनशी अनुकूलता, ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम, प्रत्येक बाजूला चार दरवाजांची स्टेनलेस स्टील बॉडी आणि प्रवाशांना सायकलसह प्रवास करता येऊ शकेल, असे मेट्रोचे फायदे आहेत. बीईएमएल, बंगळुरु हे हिटाची, जपान यांच्या तांत्रिक सहकार्याने मेट्रोचे सेट तयार करत आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही प्रकल्पातून दररोज सुमारे ९ लाख प्रवासी प्रवास करतील. सहा डब्यांच्या ट्रेनकरिता प्रवासी भाडे दराचा विचार करत हे भाडे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे असेल.