Join us

मुंबईत या वर्षी नव्या मार्गावर मेट्रो धावणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 5:36 PM

मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकांना मार्च, २०२१ नंतरच मुहूर्त; एमएमआरडीएच्या सर्व प्रकल्पांची डेडलाईन किमान तीन महिने लांबणीवर

 

मुंबई :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या लाँकडाऊनमुळे एमएमआरडीएच्या सर्व प्रकल्पांची डेडलाईन किमान तीन महिन्यांनी लांबणीवर पडणार आहे. मेट्रो २ अ आणि ७ या मार्गिकांचे काम प्रगतीपथावर असले तरी डिसेंबर, २०२० या निर्धारित वेळेत ती कामे पूर्ण होणे अशक्य आहे. त्यासाठी एप्रिल, २०२१ पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे या वर्षी मुंबईतल्या नवीन मार्गिकांवर मेट्रो धावणार नसल्याचे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. 

एमएमआरडीएच्या ट्रान्स हार्बर लिंकसह प्रस्तावित १६ मेट्रो मार्गिकांपैकी १२ मार्गिकांच्या प्रत्यक्ष कामांना सुरूवात झाली आहे. त्यापैकी दहिसर डीएन (२ अ) आणि दहिसर अंधेरी (७) या मार्गिकांचे सर्वप्रथम म्हणजे डिसेंबर, २०२० मध्ये लोकार्पण अपेक्षित होते. हे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल असा दावा गेल्या आठवड्यापर्यंत केला जात होता. मात्र, एमएमआरडीएच्या ताफ्यात ११ हजार मजूरांची फौज सक्रीय असली तरी या कामांमध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. देशातून मागवली जाणारी आणि परदेशातून आयात होणारी साधन- सामग्री मिळेनाशी झाली आहे. रोलिंग स्टाँकचे कामही मंदावले आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत काम पूर्ण होणार नाही. दुर्देवाने मुंबईतील कोरोनाचा प्रकोप आटोक्यात आला नाही तर ही परिस्थिती आणखी बिकट होईल. त्यामुळे प्रकल्पांच्या विलंबाचा काळ आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

एमएमआरडीएला भुर्दंड

या विलंबासाठी एमएमआरडीए किंवा कंत्राटदारांचा दोष नाही. परंतु, कामास विलंब झाल्यामुळे भाववाढ होणार असून करारातील तरतुदीनुसार तो भुर्दंड एमएमआरडीआला सोसावा लागेल असे अधिका-यांनी सांगितले. सध्याचे वातावरण अनिश्चिततेचे आहे. त्यामुळे प्रकल्प विलंब आणि खर्च वाढ याबाबत ठोस अंदाज कुणालाही व्यक्त करता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

-------------------------------

मजूरांना घर वापसीचे वेध

एमएमआरडीएच्या कंत्राटदारांच्या लेबर कँम्पमध्ये ११ हजार मजूरांची फौज असली तरी आपल्या बांधवांची घरवापसी बघून त्यांनाही घरचे वेध लागले आहेत.  इथल्या कँम्पमध्ये तुम्ही सुरक्षित आहात. परतीच्या प्रवासात कोरोनाची लागण होऊ शकते असे सांगत कंत्राटदार त्यांची समजूत काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे अधिका-यांनी सांगितले. या लाँकडाऊनच्या काळातील जेवण, औषधोपचार, तपासण्या आणि अन्य खर्च तूर्त कंत्राटदारांनी केला असला तरी त्याची भरपाई एमएमआरडीएला द्यायची आहे असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :मेट्रोकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस